आज थंडावणार प्रचाराच्या तोफा

By admin | Published: June 18, 2015 10:13 PM2015-06-18T22:13:37+5:302015-06-19T00:21:01+5:30

अखेरच्या टप्प्यात भडकतंय पत्रकयुद्ध

Today's stoppage of propaganda | आज थंडावणार प्रचाराच्या तोफा

आज थंडावणार प्रचाराच्या तोफा

Next

प्रमोद सुकरे - कऱ्हाड -यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २१ जून रोजी होत आहे. निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आरोप- प्रत्यारोपांचा गदारोळ पाहायला मिळाला असून शुक्रवार, दि. १९ रोजी या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत; पण अखेरच्या टप्प्यात पत्रक युद्धही चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळत आहे.
‘कृष्णे’च्या निवडणुकीत यंदा प्रथमच तिरंगी लढत होत आहे. विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल, मदनराव मोहिते व डॉ. इंद्रजित मोहिते यांचे रयत पॅनेल तर डॉ. सुरेश भोसले यांचे सहकार पॅनेल यांच्यातही लढत होत आहे. स्थानिक नेत्यांपासून राज्यस्तरीय नेतृत्वापर्यंत सर्वजण या प्रचारात उतरल्याने प्रचाराचा धुरळा उडाला आहे.
झेंडे, टोप्या, कापडी फलक, फ्लेक्सबोर्ड, एलईडी स्क्रीन अन् सोशल मीडिया आदी माध्यमांचा वापर प्रचारात मोठ्या प्रमाणात झाल्याने विधानसभा निवडणुकीसारखीच परिस्थिती साऱ्यांना अनुभवायला मिळतेय. गेले महिनाभर कोपरा सभा अन् जाहीर सभा सुरू आहेत. या सभांमधून आराप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
तिन्ही पॅनेलकडून तगडे उमेदवार रिंगणात उतरविण्यात आल्याने निवडणूक चुरशीची बनली आहे. कारखान्याच्या निवडणुकीतील विजय हा या नेत्यांना नजीकच्या काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत होणार असल्याने या उमेदवारांनी गुलाल मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान, निवडणूक अंतिम टप्प्यात आली असताना तिन्ही पॅनेलने प्रचार पत्रकांवर भर दिला आहे. पॅनेलचा जाहीरनामा तर यापूर्वीच प्रसिद्ध झालाय; पण व्यासपीठावर जे बोलून झालंय अन् जे बोलायचं राहून गेलंय त्याची गोळाबेरीज करून काही भडक पत्रके शेवटच्या टप्प्यात काढल्याने सभासदांचीच ‘मती’ गुंग होण्याची वेळ आली आहे.


प्रेमात अन् युद्धात सारं काही माफ !
खरंतर निवडणूक सहकारी साखर कारखान्याची आहे. त्यामुळे प्रचारात कारखान्याच्या कारभारावरच जास्त चर्चा व्हायला पाहिजे; पण या प्रचार सभांमधून कारखान्यावर कमी अन् व्यक्तिगत पातळीवरच आरोप-प्रत्यारोप जास्त प्रमाणात ऐकायला मिळाले. तरीही प्रत्येकजण आम्ही फक्त कारखान्याबाबतच बोलत असतो. विरोधकच वैयक्तिक पातळीवर टीका करतात, असे सांगून मोकळे होताना दिसले. तर काहीना प्रेमात अन् युद्धात सारं काही माफ असतं, असं सांगून टाकलं; पण व्यक्तिगत पातळीवरचे हे आरोप सुज्ञ सभासदांना किती पचनी पडणार, हा संशोधनाचा भाग आहे.
सभासदांना दररोजच्या प्रीतिभोजनाचं निमंत्रण !
निवडणूक आली की, हौसे, नवसे, गवसे यांची गर्दी असतेच. उमेदवारांना या साऱ्यांना सांभाळावे लागते. उमेदवारांकडून दररोजच प्रीतिभोजनाचं निमंत्रण दिलं जात असून, कार्यकर्त्यांचीही आपसूक सोय होत आहे.

Web Title: Today's stoppage of propaganda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.