गुन्हेगारी संपविण्यासाठी एकत्र या...

By admin | Published: December 17, 2015 10:22 PM2015-12-17T22:22:04+5:302015-12-17T22:53:17+5:30

फलटण शहर : नागरिकांच्या अपेक्षा; ‘लोकमत’च्या धाडसी भूमिकेचे स्वागत

Together to end crime ... | गुन्हेगारी संपविण्यासाठी एकत्र या...

गुन्हेगारी संपविण्यासाठी एकत्र या...

Next

फलटण : फलटण तालुक्यातील वाढती गुन्हेगारी, दहशत याविरोधात ‘लोकमत’ने उचललेल्या धाडसी भूमिकेचे स्वागत होत असतानाच गुन्हेगारी संपविण्यासाठी पोलिसांबरोबरच विविध घटकांनीही एकत्र येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. वारंवार होणारा बंद व दवाखाने, बसेसची मोडतोड थांबवण्याची गरज व्यक्त होत आहे.
फलटण तालुक्यात वाढत्या चोऱ्या, गुंडगिरी, दहशत, वारंवार बंद याला जनता कंटाळली आहे. पोलिसांकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त होत असताना त्या पूर्ण होताना दिसत नाहीत. त्यामुळे जनतेमध्ये अस्वस्थता आहे. राजकीय नेतेमंडळी स्वार्थासाठी काही गुंडाना हाताशी धरताना राजकारण करीत असल्याचे प्रकार आढळून येत आहेत. यालाही आळा घालण्याची गरज व्यक्त होत आहे. काही समाजकंटकांनी फलटणमधील हॉटेल, एटीएम, दवाखाने, दुकाने बसेस यांची मोडतोड केल्याने हे प्रकार थांबविण्याची गरज आहे.
तालुक्यात किंवा तालुक्याबाहेर एखादी घटना घडली की त्याचे पडसाद तालुक्यात सर्वत्र उमटतात. वारंवार फलटण शहर बंद ठेवले जाते. याला व्यापारी, लहानमोठे विक्रेते वैतागले आहेत. बंद पाळतानाही दहशत निर्माण केली जात असल्याने याला कोठेतरी आळा बसण्याची अपेक्षा जनता करीत आहे.
सध्या फलटण शहरात रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून मोठ्या प्रमाणात विक्रेते आले आहेत. मागील चार, पाच वर्षांपासून रामरथोत्सवाचा बाजार वारंवारचा बंद व दहशत यामुळे कमी कमी होत चालला आहे. पूर्वी महिना-महिना थांबणारे व मोठ्या संख्येने येणारे विक्रेते फलटणला खूपच कमी प्रमाणात येत आहेत. हातावर पोट असलेल्या या विक्रेत्यांनाहीदोन दिवसांपूर्वीच्या बंदचा व तोडफोडीचा फटका बसल्याने काहींनी आपला गाशा गुंडाळा आहे. पुढच्यावर्षी रथोत्सवाला अशा वातावरणात किती विक्रेते येतील याची आता चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
फलटणची दहशत, वारंवारचे बंद, एकटे पोलीस संपवू शकत नाहीत. त्यासाठी राजकीय नेतेमंडळी, सर्व समाजातील व्यक्तिंनी एकत्र येऊन प्रतिकार करण्याची गरज आहे. फलटण बंद राहणार नाही याची काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या तोडफोडीबाबत अनेकांनी गुन्हे दाखल करण्यात असमर्थता व्यक्त केली. या मागची कारणे वेगवेगळी असली तरी गुन्हे दाखल करण्याची मानसिकता दिसून येत नाही. (प्रतिनिधी)

दहशतीला कोणी थारा देऊ नये
फलटण तालुक्यात वाढत चाललेल्या दहशतीला, गुंडगिरीला कोणी थारा देऊ नये. या पार्श्वभूमीवर राजकीय कार्यकर्ते, पोलीस, पत्रकार, समाजातील सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. काही मुठभर लोक वैयक्तिक कारणासाठी सातत्याने फलटण बंद करीत आहेत. त्याला आमचा विरोध आहे. फलटण यापुढे बंद होऊ नये, असे आवाहन रघूनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.

Web Title: Together to end crime ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.