शौचालयच झाले तीन भावंडांसाठी स्टडी रूम; आगळ्या-वेगळ्या दृश्याने हेलवतायत नागरिकांची मने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 12:54 AM2019-12-24T00:54:18+5:302019-12-24T00:57:17+5:30
आपल्या आई-वडिलांचे दारिद्र्य दूर करायचंय, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सातवीमध्ये शिकत असणारी मोठी मुलगी सोनी चौधरी ‘लोकमत’शी बोलताना सांगत होती. माझ्या मोठ्या बहिणीनेही याच शौचालयात अभ्यास करून बारावी पूर्ण केलीय. आम्ही भावंडंही बहिणीपेक्षा जास्त शिक्षण घेणार आहोत.
दता यादव ।
सातारा : स्टडी रूम म्हटलं की छानशी हवेशीर जागा. शांत चित्ताने बसल्यावर अभ्यासाकडे लक्ष जाईल; पण साताºयातील एका कुटुंबातील तीन भावंडांनी परिस्थितीचे चटके सहन करत चक्क शौचालयात स्टडी रूम तयार केलीय. शाळेत जाण्यापूर्वी आणि शाळा सुटल्यानंतर ही मुले या ठिकाणी अभ्यास करताना पाहायला मिळतात. हे दृश्य पाहून अक्षरश: मन हेलावून जाते.
बिहारमधून रामप्रवेश चौधरी (वय ५२) हे गेल्या आठ वर्षांपूर्वी साताºयात आले. गोडोलीमध्ये त्यांनी छोटीसी खोली भाड्याने घेतली. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा. मोठ्या मुलीचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. रामप्रवेश चौधरी यांना गोडोली चौकात असणारे सार्वजनिक शौचालय स्वच्छ करण्याची नोकरी मिळाली. महिन्याला पाच हजार रुपये त्यांना यातून मिळतात. तर त्यांची पत्नी बेबी चौधरी या हॉटेलमध्ये धुणीभांडी आणि स्वयंपाकाचे काम करतात. त्यांनाही महिन्याला चार हजार रुपये मिळतात. अशा प्रकारे त्यांची हलाखीच्या परिस्थिती असताना हे कुटुंब मुलांच्या शिक्षणासाठी जीवाचे रान करत आहेत.
रामप्रवेश चौधरी हे पहाटे पाच वाजता घर सोडतात. तर त्यांची पत्नी सकाळी आठला कामावर जाते. सहा वर्षांचा मुलगा शिवणकुमार हा अंगणवाडी तर सुमनकुमारी सहावीला आणि सोनी चौधरी सातवीला
आहे. ही तिन्ही भावंडे साताºयातील गोळीबार मैदान येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत
आहेत.
घरात सकाळी कोणी नसल्यामुळे आई कामावर जाताना मुलांना वडिलांकडे सोडून जाते. मुलांची शाळा दुपारी बारा वाजता भरते. तोपर्यंत ही मुले वडील काम करत असलेल्या शौचालयात अभ्यास करत असतात. शौचालयातील खुंटीला त्यांनी त्यांची दप्तरे अडकवली आहेत. शौचालयातील उग्र वास त्यांच्या आता सवयीचा झाला आहे. शौचालयाची सर्वच दरवाजे सताड उघडे असतात. मात्र, तरीही ही भावंडे अभ्यासात मग्न असल्याचे पाहायला मिळतात. कोणी लघुशंकेसाठी येते तर कोणी प्रात:विधीसाठी. मात्र, ही मुले त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. आदल्या दिवसाचा होमवर्क तेथे शाळेत जाईपर्यंत पूर्ण करत असतात. ना ते वाहनांच्या आवाजामुळे विचलित होतात ना दुर्गंधीमुळे. आपल्या आई-वडिलांचे दारिद्र्य दूर करायचंय, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सातवीमध्ये शिकत असणारी मोठी मुलगी सोनी चौधरी ‘लोकमत’शी बोलताना सांगत होती. माझ्या मोठ्या बहिणीनेही याच शौचालयात अभ्यास करून बारावी पूर्ण केलीय. आम्ही भावंडंही बहिणीपेक्षा जास्त शिक्षण घेणार आहोत.
- रविवारची सुटीही शौचालयातच..
चौधरी भावंडांना रविवारी शाळेला सुटी असली तरी ही भावंडे शौचालयातील स्टडी रूममध्येच अभ्यास करणे पसंद करतात. वडिलांचेही त्यांच्यावर लक्ष राहते. त्यामुळे ही मुले खेळण्यासाठीही रस्त्यावर येत नाहीत. गेल्या काही वर्षांपासून ही मुले सातत्याने या ठिकाणी येत आहेत.
- ...म्हणून आमच्याकडे शाळेतील मुले येत नाहीत
आम्हाला कोणी पैसे देईल, म्हणून आम्ही इथे बसत नाही. वडिलांचे आमच्यावर लक्ष राहील म्हणून आम्ही शौचालयातच अभ्यास करतो. आम्हाला त्याचा कमीपणा वाटत नाही. आम्ही इथे अभ्यास करतो म्हणून शाळेतील मुले आमच्याकडे येतपण नाहीत, अशी सुमनकुमारी सांगत होती.
- वडिलांचे बेडरूमही इथेच..
रामप्रवेश चौधरी हे पहाटे पाच वाजता शौचालयाची स्वच्छता करण्यासाठी येतात. रात्री नऊ वाजता ते घरी जातात. दिवसभर त्यांना थकवा जाणवतो. त्यामुळे शौचालयातच एक लाकडी बाकडा त्यांनी तयार केला असून, या बाकड्यावर ते दुपारची वामकुक्षी घेतात.
- शौचालयातून उग्र वास येत असतानाही मुले अभ्यासात मग्न
- शौचालयातील भिंतीवर दप्तरे अडकविण्यासाठी ठोकलीय खुंटी
- बराचवेळ शौचालयात अभ्यास केल्यामुळे हात-पाय स्वच्छ धुवून मुले जातायत शाळेत.
- दप्तरात वह्या, पुस्तकांसोबत ठेवतायत साबण
- सकाळी चार अन् संध्याकाळी तीन तास शौचालयात स्टडी.