एकांंतवासात गेला ‘तोल’...हनी ट्रॅप जाळ्याचा ‘झोल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:39 AM2021-03-10T04:39:05+5:302021-03-10T04:39:05+5:30
सातारा : पत्नी माहेरी गेल्यानंतर मद्याच्या नशेत असलेल्या युवकाचा ‘तोल’ गेला. व्हॉटस ॲपवर आलेली लिंक ओपन करून त्याने मुलीला ...
सातारा : पत्नी माहेरी गेल्यानंतर मद्याच्या नशेत असलेल्या युवकाचा ‘तोल’ गेला. व्हॉटस ॲपवर आलेली लिंक ओपन करून त्याने मुलीला मेसेजही केला; परंतु मुलीचा प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याचा आणखीनच ‘तोल’ गेला. पाच हजारांची रक्कम पाठविल्यानंतर आणखी पैशांची मागणी झाली तेव्हा तो युवक ताळ्यावर आला पण तोपर्यंत सारी माहिती तिच्या हाताला लागली. तिने हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढून फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तंबी दिल्यानंतर संबंधित युवकाच्या पायाखाली वाळू सरकली. ही धक्कादायक घटना सातारा तालुक्यातील एका गावात घडलीय.
साताऱ्यामध्ये अलीकडे हनी ट्रॅपच्या घटना वाढत असून उद्योजक, डॉक्टर, व्यावसायिक आणि नोकरदार वर्ग हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकत आहेत. असाच प्रकार दोन दिवसांपूर्वी एका युवकावर ओढावला आहे. संबंधित युवकाची पत्नी माहेरी गेली होती. त्यावेळी अनोळखी नंबरवरून त्याच्या व्हाॅटस ॲपवर एक लिंक आली. ही लिंक त्याने ओपन केल्यानंतर त्याला मुलींचे फोटो आणि काही माहिती पाहायला मिळाली. हे फोटो पाहून अगोदरच मद्याच्या नशेत असल्यामुळे त्याचा ‘तोल’ गेला. एकमेकांना मेसेज पाठविल्यानंतर त्या मुलीने त्याच्याकडे दोन हजारांची मागणी केली. त्यानंतर तीन हजार, असे एकूण पाच हजार रुपये त्याने पाठविल्यानंतर मागणीची रक्कम आणखीनच वाढत गेली. त्यामुळे तो शुद्धीवर आला. त्याने पुन्हा पैसे पाठविले तर नाहीच शिवाय त्या मुलीशी बोलणेही बंद केले पण झाले वेगळेच. त्या मुलीने फेसबुकवर जाऊन त्या युवकाची सर्व माहिती काढली. त्याचे फॅमिली फोटो, फोननंबर घेऊन तिने त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. पैसे दिले नाहीस तर मेसेज, ‘तसले’ फोटो, व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे गांगरून गेलेला युवक सातारा तालुका पोलीस ठाण्यात पोहोचला. पण इथं त्याला वेगळाच अनुभव आला. हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवणारी ही टोळी परराज्यातील आहे. त्यामुळे ही टोळी सापडत नाही. अर्ज द्या. त्या मुलीने फोटो व्हायरल केले तर पाहू, अशी समजूत काढून त्याला घरी पाठविण्यात आले. सरतेशेवटी त्या युवकाने सायबर सेलचाही दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला. पण अगोदर त्या पोलिसाने दिलेला सल्ला त्याचे मन खचून जाण्यास कारणीभूत ठरला. हनी ट्रॅपची टोळीच जर सापडणार नसेल तर मी तक्रार देऊन काय करू, अशी मानसिकता त्या युवकाची झाली. त्यामुळे आता त्याचे लक्ष केवळ सोशल मीडियावर आहे. आपले ‘तसले’ फोटो व्हायरल कधी होतील, याची शाश्वती नसल्याने संबंधित युवक चिंताग्रस्त बनलाय.
चाैकट :
तक्रार घ्या..अन् टोळी नेस्तनाबूत करा!
हनी ट्रॅपच्या जाळ्यात बड्या व्यावसायिकांना ओढून ब्लॅकमेल केले जाते. अशावेळी पोलिसांनी पीडित व्यक्तीला विश्वासात घेऊन त्याची तक्रार नोंदवून घेतली पाहिजे. एक तक्रारदार पुढे आला तर शंभरजणांची फसवणूक टळेल, अशी भूमिका घेऊन पोलिसांनी हनी ट्रॅपचे जाळे नेस्तनाबूत करणे गरजेचे आहे.