टोलनाका व्यवस्थापनास दिवाळीपर्यंत मुदतवाढ--आनेवाडीत पोलिसांचा फौजफाटा तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 11:04 PM2017-10-06T23:04:15+5:302017-10-06T23:04:38+5:30
पाचवड : आनेवाडी टोलनाक्याच्या व्यवस्थापन बदलावरून गुरुवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून उदयनराजे यांनी टोलनाक्यावर तळ ठोकून
लोकमत न्यूज नेटवर्क
पाचवड : आनेवाडी टोलनाक्याच्या व्यवस्थापन बदलावरून गुरुवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून उदयनराजे यांनी टोलनाक्यावर तळ ठोकून टोलनाका टोल फ्री केलेला होता. दरम्यान, घडलेल्या अनेक घडामोडीनंतर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास उदयनराजे यांचेच व्यवस्थापन टोलनाक्यावर दिवाळीपर्यंत अबाधित राहणार असल्याची माहिती ईमेलमार्फत मिळाल्यावर पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास नाक्यावरील टोलवसुली पूर्ववत सुरू झाली.
टोलनाक्यावरील राजेंच्या व्यवस्थापनास दिवाळीपर्यंत मुदतवाढ मिळाल्यानंतर आनेवाडी टोलनाक्यावरील वातावरण रात्री दोन वाजण्याच्या सुमारास सुरळीत झाले. गुरुवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून पहाटे दोन वाजेपर्यंत टोल फ्री झालेल्या नाक्यावर त्यानंतर वाहनांच्या टोलवसुलीस सुरुवात झाली.
दोन्ही राजेंच्या समर्थकांमध्ये गुरुवारी रात्रभर सुरू असलेल्या वादावादीचे पडसाद टोलनाक्यावर उमटू शकतात, या शक्यतेमुळे टोलनाक्यावर पोलिसांचा मोठा
फौज फाटा तैनात ठेवण्यात आला होता. शुक्रवारी
टोलनाक्यावर कोणताही
अनुचित प्रकार घडला नाही,
मात्र टोलनाक्यावर शुक्रवारी
दिवसभर तणावपूर्ण शांतता जाणवत होती.
दगडफेकीच्या अफवा
टोलनाक्यावर जोरदार दगडफेक झाली असल्याची अफवा पसरली असून, अशा प्रकारचा कोणताही अनुचित प्रकार टोलनाक्यावर घडलेला नाही. टोलनाक्यावर पूर्णपणे शांतता असून, खबरदारीचा उपाय म्हणून योग्य तो पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.