आरडाओरडा करू नको म्हटलं, संशयिताने चिडून वृद्धाचा केला खून; साताऱ्यातील वडूथ येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 12:09 PM2023-08-01T12:09:11+5:302023-08-01T12:09:24+5:30
संशयिताला सातारा तालुका पोलिसांनी तातडीने अटक केली
वडूथ : आरडाओरडा करू नको, लहान मुलं आजारी आहे, असे म्हटल्याच्या कारणावरून पोपट गुलाब मदने (वय ६५, रा. वडूथ, ता. सातारा) यांच्यावर एकाने चाकूने वार करून त्यांचा खून केला. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री दहा वाजता घडली असून, संशयिताला सातारा तालुका पोलिसांनी तातडीने अटक केली.
उमेश गुलाब राठोड (वय ३६, रा. वडूथ, ता. सातारा) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पोपट मदने हे कुटुंबीयांसोबत एकत्र राहत आहेत. मदने व राठोड एकाच परिसरात जवळजवळ राहत आहेत. रविवारी रात्री उमेश राठोड हा आरडाओरडा करत होता. घरामध्ये वृद्ध माणसे व लहान बाळ असल्याने मदने कुटुंबीयांनी उमेश याला आरडाओरडा करू नको, असे म्हटले.
यातून वादावादीला सुरुवात झाली. पाहता पाहता वाद विकोपाला गेला व चिडलेल्या उमेशने धारदार चाकू काढून पोपट मदने यांच्या छातीवर सपासप वार केले. यात पोपट मदने गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकारानंतर सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन उमेश राठोड याला अटक केली. पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके हे अधिक तपास करीत आहेत.