खूप सहन केले, आता दुकाने उघडण्यास परवानगी द्या : विकास गोसावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:47 AM2021-07-07T04:47:43+5:302021-07-07T04:47:43+5:30
सातारा : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे साताऱ्यातील व्यावसायिक व व्यापारी वर्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. गेले ९० दिवसांहून अधिक ...
सातारा : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे साताऱ्यातील व्यावसायिक व व्यापारी वर्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. गेले ९० दिवसांहून अधिक काळ व्यापाऱ्यांची दुकाने व आस्थापने बंद आहेत. त्यामुळे त्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी दुकाने उघडण्यास आता परवानगी द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव घटत असूनदेखील प्रशासनाकडून लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यासाठी कोणत्याही प्रकारची पावले उचलली जात नाहीत. गेल्या तीन महिन्यांपूर्वी कोरोना रुग्णसंख्या १०० च्या घरात होती. परंतु व्यापारी दुकाने बंद असूनदेखील रुग्णसंख्या वाढत आहे, काही ठिकाणी टेस्टचे रिपोर्ट पोर्टलला भरायचे राहिले होते, ते आता भरण्याचे काम चालू आहे, असे समजते आहे. जम्बो कोविड सेंटरसहित अनेक दवाखान्यांमध्ये बेड मोकळे आहेत, त्यामुळे कोरोनाचे पेशंट खरेच वाढतायत की हा प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे, हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे ,याचाच अर्थ असा की कोरोना हा फक्त व्यापारीवर्गामुळे वाढलेला नाही. त्यामुळे कोरोनाचे कारण देऊन सरकार व्यापाऱ्यानांच किती दिवस वेठीस धरणार? लॉकडाऊनच्या निर्बंधाचा खरंच काही उपयोग आहे का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोनाचा हा काळ किती दिवस चालेल हे सांगता येणार नाही. सदरच्या काळात व्यापारीवर्गाने प्रशासनाला दुकाने उघण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे तरी या व्यापाऱ्यांच्या मागणीचा प्रशासनाने सहानभूतीपूर्वक विचार करून दुकाने उघडण्याची परवानगी देऊन त्यांना या संकटकाळात दिलासा द्यावा. इतके दिवस व्यवसाय बंद असलेने कामगारांचे पगार, कोरोना काळातील लाईट बिल भरणे व दुकान भाड़े भरणे, कर्जाचे हप्ते भरणे, व्यापाऱ्यांना असह्य झाले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत आता सरकारने पाहू नये. जर शासनाने निर्बंध शिथिल करण्यात दिरंगाई केली तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने त्वरित निर्बंध शिथिल करावेत.
यावेळी जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. खामकर, राहुल शिवनामे, सातारा शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, जयदीप ठुसे, युवा मोर्चा अध्यक्ष विक्रम बोराटे, सातारा शहर उपाध्यक्ष चंदन घोडके, वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. रेपाळ, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. सचिन साळुंखे, सरचिटणीस मनीष महाडवाले उद्योजक आघाडी जिल्हाध्यक्ष नीलेश शहा, सरचिटणीस दीपक क्षीरसागर, उपाध्यक्ष अमोल टांकसाळे, अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्ष शैलेंद्र कांबळे सरचिटणीस सोनवणे उपस्थित होते.