टोल दरवाढ त्वरित मागे घेऊन पूर्वीच्या टोलमध्येच कपात करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:35 AM2021-04-03T04:35:58+5:302021-04-03T04:35:58+5:30

सातारा : सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी आणि खेडशिवापूर टोलनाक्यावरील टोलच्या दरात सुमारे ५ टक्के केलेली टोल दरवाढ ही अन्यायकारक ...

The toll hike should be withdrawn immediately and the previous toll should be reduced | टोल दरवाढ त्वरित मागे घेऊन पूर्वीच्या टोलमध्येच कपात करावी

टोल दरवाढ त्वरित मागे घेऊन पूर्वीच्या टोलमध्येच कपात करावी

Next

सातारा : सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी आणि खेडशिवापूर टोलनाक्यावरील टोलच्या दरात सुमारे ५ टक्के केलेली टोल दरवाढ ही अन्यायकारक आणि प्रवासी आणि संबंधीतांच्या संयमाचा अंत पाहणारी आहे. वास्तविक या रस्त्याचे काम सन २०१३ मध्ये पूर्ण होणार होते. मूळची मुदत संपूनही सुमारे ८ वर्षे झाली, तरी काम पूर्ण झालेले नाही. म्हणूनच ५ टक्के वाढ करण्याऐवजी जुन्या टोलदरातच ५ टक्क्यापेक्षा जास्त टोल करकपात करावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे की, सातारा ते पुणे या राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना अनेक गैरसोयींचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. असलेले सेवा रस्ते अत्यंत खराब आहेत. काही ठिकाणी सेवा रस्ते आहेत की नाहीत, हे देखिल समजत नाही. रस्त्यांवरील खड्डयांची तर मोजदादही करता येत नाही. इतके असंख्य खड्डे आहेत. हा राष्ट्रीय महामार्ग खरंच आहे का? असा प्रश्न वाहनचालकांना आणि प्रवाशांना पडत असतो. दिशादर्शक - स्थलदर्शक फलकांची वानवा आहे. काही वेळा अपरिचित वाहनचालकांला एखादे गाव कधी आपण मागे टाकले हे देखिल कळत नाही. ट्रक ले-बाय, शौचालय सुविधा इत्यादी बाबी तर सुरुवातीपासूनच गायब आहेत. शेजारील कर्नाटक राज्यातील याच राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी आणि खेडशिवापूर टोलनाक्यांपेक्षा कमी टोल दर देऊन प्रवास करणारे वाहनचालक आणि प्रवासी हे सातारा-पुणे प्रवासादरम्यान प्रत्येक असुविधेबाबत आणि खड्‌डयांबाबत अक्षरश: लाखोली वाहत असतात.

यासारख्या अनेक सुविधांची असलेली वानवा लक्षात घेता, सध्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाने) आणि टोल चालविणाऱ्या रिलायन्स व्यवस्थापनाने टोल दरवाढ करून, प्रवासी आणि वाहनचालक/धारकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यांनी केलेली दरवाढ त्वरित मागे घ्यावी, तसेच नुसती दरवाढ मागे न घेता, जुन्या दरात ५ टक्क्यापेक्षा जास्त रकमेची टोल करकपात करावी, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

Web Title: The toll hike should be withdrawn immediately and the previous toll should be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.