आनेवाडीतील टोल व्यवस्थापन बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:41 AM2021-04-02T04:41:06+5:302021-04-02T04:41:06+5:30
सातारा : हाणामारी, वादावादी आणि पावत्यांचा झोल यामुळे चर्चेत असलेल्या आनेवाडी टोलनाक्याचे व्यवस्थापन दिनांक ३ एप्रिलपासून बदलणार आहे. हा ...
सातारा : हाणामारी, वादावादी आणि पावत्यांचा झोल यामुळे चर्चेत असलेल्या आनेवाडी टोलनाक्याचे व्यवस्थापन दिनांक ३ एप्रिलपासून बदलणार आहे. हा टोल नाका रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी लावून धरली होती; परंतु आता याच टोलनाक्याचे व्यवस्थापन राष्ट्रवादीचे पुण्यातील नगरसेवक काकडे यांच्याकडे देण्यात येणार आहे.
सातारकरांच्या टीकेचा आणि राजकीय संघर्षाचे निमित्त ठरलेल्या आनेवाडी टोलनाक्याचे व्यवस्थापन खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक अशोक सावंत यांच्याकडून काढून घेण्यात आले आहे. दिनांक ३ एप्रिलपासून या टोल नाक्याची जबाबदारी पुण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन दोडके यांना देण्यात आली आहे.
या हस्तांतरणाद्वारे महाविकास आघाडीने उदयनराजे भोसले यांना राजकीय धक्का दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून गुरूवारी आनेवाडी टोल नाक्यावर प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उदयनराजे समर्थक अशोक सावंत यांच्या अशोका स्थापत्य कंपनीकडे खेड शिवापूर व आनेवाडी टोल नाक्याचे व्यवस्थापन देण्यात आले होते. येत्या तीन दिवसात व्यवस्थापन हस्तांतरण होणार असल्याने पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्या आदेशाप्रमाणे मोठ्या प्रमाणावर कुमक वाढविण्यात आल्याने आनेवाडी टोल नाक्याला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. आनेवाडी टोल नाक्याच्या टोल वसुलीवरून सातत्याने होणारी भांडणे, फास्टॅगच्या तांत्रिक अडचणी, रिलायन्स इन्फ्राच्या सदोष सुविधा यामुळे आनेवाडी टोलनाका सातत्याने चर्चेत असतो. दोन वर्षांपूर्वी आनेवाडी टोल नाक्याचा ताबा घेण्यावरून दोन्ही राजे समर्थकांमध्ये जोरदार संघर्ष झाला होता. मात्र, अशोका स्थापत्यने या टोलनाक्यांवर नियंत्रण ठेवले होते. आनेवाडी टोलनाका हस्तांतरणाची बरेच दिवसांपासून चर्चा सुरू होती.
दरम्यान, महाविकास आघाडीने आनेवाडी येथील टोल व्यवस्थापन आपल्या ताब्यात घेतले असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या मागणीनुसार कऱ्हाड आणि सातारा आरटीओ पासिंगच्या गाड्यांबाबतचा निर्णयदेखील तत्काळ घ्यावा, अशी स्थानिक जनतेची मागणी आहे.
चौकट-
टोल वाढ झाल्याने वाहनधारकांना फटका
पुणे - बेंगलोर महामार्ग सहापदरीकरणाचे काम रिलायन्स इन्फ्राने घेऊनही तब्बल आठ वर्ष हे काम संपलेले नाही. तब्बल तीनवेळा या कामाला मुदतवाढ देण्यात आली आहे. आनेवाडी टोलनाक्यावरून जाणाऱ्या सर्व वाहनांना पाच टक्के टोलवाढ लागू झाली आहे. कार, जीप, व्हॅनला एकेरीसाठी १०० तर दुहेरीसाठी १५०, ट्रक आणि बससाठी एकेरी प्रवासासाठी ३४० रुपये तर दुहेरीसाठी ५०५ रुपये टोल लागू झाला आहे.