आधी सुविधा मगच मिळणार टोलचा मेवा : पवनजित माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 01:01 AM2019-10-20T01:01:43+5:302019-10-20T01:02:40+5:30
रस्ता चांगला केला तर टोल द्यायला कोणालाच काहीच वाटणार नाही. सुविधेशिवाय टोल घेणं हा खंडणीचाच प्रकार वाटतोय. - पवनजित माने
प्रगती जाधव-पाटील ।
वाहन चालवताना रस्त्यावर किमान सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने टोल फ्री, होल फ्री, झोल फ्री अशी अनोखी मोहीम फेसबुकच्या माध्यमातून गेल्या दहा दिवसांपासून सुरू आहे. या मोहिमेत साताऱ्यातील पवनजित माने याने पुढाकार घेतला आहे. टोलमुक्त रस्त्यांची हाक देणा-या पवनजितने या मोहिमेविषयी संवाद साधला ...
प्रश्न : या मोहिमेची सुरुवात कशी झाली आणि पुढील स्वरुप कसे आहे?
उत्तर : सांगली, कोल्हापूर आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांतून नोकरी व्यवसायासाठी जाणाऱ्यांमध्ये रस्त्यांची दुर्दशा या अनुषंगाने कायम चर्चा व्हायची. कष्टानं कमावलेले पैसे पात्रता नसलेल्या रस्त्यासाठी टोलच्या स्वरुपात का भरायचे? असा प्रश्न अनेकांना पडला. याविषयी आम्ही एकत्र चर्चा करत असतानाच ही मोहीम आकाराला येऊ लागली. सर्वसामान्यांसह स्थानिकांना सोबत घेऊन ही मोहीम पुढं नेण्याचं नियोजित आहे. यासाठीची पूर्ण यंत्रणा पुण्यातून कार्यान्वित होत आहे. याची जनहित याचिकाही लवकरच दाखल करणार आहे.
प्रश्न : मोहिमेला प्रतिसाद कसा मिळतोय?
उत्तर : ही मोहीम मुळातच सामान्यांच्या उठावाचा परिणाम आहे. अनेकांच्या मनातील प्रश्न आम्ही समाज माध्यमांद्वारे मांडला आणि तो सर्वांनाच भावला. हजारो नेटकºयांनी ही पोस्ट आपापल्या परीनं फिरवली आणि मोहीम सुरू झाली. लोकांचा सहभाग वाढवून त्यांना आपल्या न्याय हक्कांची जाणीव करून देणं हा या मोहिमेचा पुढील टप्पा असणार आहे. त्याबरोबरच असुविधा असणाºया रस्त्यांवर टोलबंदी हा विषयही न्यायालयात याचिकेद्वारे मांडण्यात येणार आहे. प्रत्येक गावात ‘नो टोल बुथ’ दिवाळीनंतर सुरू करणार आहे. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणांपुढं जनरेट्याचा आधार घेऊन काम करण्यास भाग पाडणार. समाज माध्यमांद्वारे जास्तीत जास्त लोकांना याप्रश्नी जागृत करून त्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यास सर्व स्त्रातून या माहिमेस प्रतिसाद मिळत आहे.
प्रशासनाला निवेदन
सलग तीन दिवस आलेल्या सुट्यांमुळे पुण्यातून कोण, कसं आणि कधी प्रवास करणार याची एकत्रित माहिती आम्हाला संकलित करणं शक्य झालं नाही. त्यामुळे सातारा प्रशासनाला निवेदन दिलं नसल्याचे पवनजितने सांगितले.
मंत्रिमंडळापुढे मांडणार प्रश्न
सोशल मीडियाद्वारे सुरू झालेली ही मोहीम व्यापक प्रसिद्धी मिळवत आहे. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुका, मतदान आणि मतमोजणी यामुळे प्रशासनावर सध्या चांगलाच ताण आहे. त्यानंतर येणारी दिवाळी यामुळे अनेकजण उत्सवाच्या तयारीत आहेत. सर्वांचा विचार करता सध्या सर्वांकडून माहिती घेणं आणि संकलित करून ठेवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. दिवाळीनंतर नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाल्यावर सविस्तर आराखडा मांडणार आहे.