लाल सोनं दहा किलोला तीनशे रुपये, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांत समाधान
By दीपक शिंदे | Published: June 14, 2023 12:01 PM2023-06-14T12:01:31+5:302023-06-14T12:01:51+5:30
कधी सोनं, तर कधी चिखल
कोपर्डे हवेली : टोमॅटो उत्पादक शेतकरी टोमॅटोकडे रेड गोल्ड म्हणून पाहत असतो. गेल्या आठ महिन्यांपासून टोमॅटो दराने निच्चांकी दर गाठल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला होता. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून दरात सुधारणा होत असून, मुंबई बाजारपेठेत सध्या दहा किलोला दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांत समाधान आहे.
शेतकऱ्यांना पेसा मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी टोमॅटो पिकाकडे पाहत असतात. पण गेल्या दीड ते दोन वर्षांपासून उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने आणि तुलनेत दर कमी मिळाल्याने शेतकरी अडचणीत सापडून अनेकांनी या पिकाकडे पाट फिरविली आहे.
एकरी दोन ते अडीच लाख रुपये उत्पादन खर्च येत आहे. त्यामुळे गत वर्षाच्या तुलनेत यंदाच्या हंगामात टोमॅटोचे क्षेत्र घटले आहे.
कऱ्हाड तालुक्यातील शेतकरी आपला टोमॅटो विक्रीसाठी स्थानिक बाजारपेठेबरोबर मुंबई, पुणे, बेळगाव, अहमदाबाद आदी ठिकाणी पाठवत असतात. सध्या गेल्या पंधरा दिवसांपासून मुंबई बाजारपेठेत टोमॅटोच्या दरात सुधारणा होत आहे. १ जूनला दहा किलोचा दर ८० ते १०० रुपये होता. त्यात सुधारणा होऊन १२ जूनला दोनशे पन्नास रुपये ते तीनशे रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे.
कोपर्डे हवेली, उत्तर कोपर्डे, शिरवडे, नडशी, काले, विंगसह इतर गावांतील शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेत असतात. दरात सुधारणा झाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांत समाधान दिसून येत आहे.
टोमॅटो पीक हे आमच्या दृष्टीने सोनंच आहे. आमचा एका एकारमध्ये टोमॅटोचे पीक आहे. अडीच लाख उत्पादन खर्च आला असून, उत्पादन खर्च निघून टोमॅटो तोडा मध्यावर आला आहे. तीनशेच्या दरम्यान असाच दर राहिला तर निव्वळ नफा पाच ते सहा लाख रुपये मिळतील, अशी अपेक्षा आहे. - भाऊसाहेब चव्हाण, टोमॅटो उत्पादक शेतकरी
दर वाढण्याची कारणे...
- टोमॅटोचे घटते क्षेत्र
- चाकरमानी मुंबईत दाखल
- अवकाळी पावसामुळे टोमॅटोच्या बागा उद्ध्वस्त
- सध्या मुंबईत विद्यार्थ्यांचे क्लासेस सुरू झाल्याने भाजीसाठी टोमॅटोला मागणी
कधी सोनं, तर कधी चिखल
टोमॅटोचे पीक हे एक झुगार ठरत आहे. दरवेळी दर मनासारखा मिळत नाही. दर मिळाला तर मालामाल करते आणि नाही मिळाला तर कर्जात लोटते.