टोमॅटोच्या अकरा हजार रोपांची पाईपमध्ये लागण : कोपर्डेत शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 11:44 PM2018-05-16T23:44:11+5:302018-05-16T23:44:11+5:30
कोपर्डे हवेली : उन्हाळी हंगामातील टोमॅटोला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. वाढत्या तापमानामुळे रोपे वाळून जाणे, करपा पडणे, तांबोरा, मूळ कुजवा आदींचा प्रभाव पिकांवर पडू लागतो.
शंकर पोळ।
कोपर्डे हवेली : उन्हाळी हंगामातील टोमॅटोला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. वाढत्या तापमानामुळे रोपे वाळून जाणे, करपा पडणे, तांबोरा, मूळ कुजवा आदींचा प्रभाव पिकांवर पडू लागतो. हे रोखण्यासाठी कोपर्डे हवेली येथील शेतकरी बजरंग चव्हाण यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या संकटावर मात करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यांनी दीड एकर क्षेत्रावर अकरा हजार टोमॅटोच्या रोपांची लागण करण्यासाठी पाईपचा वापर केला.
इतर हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामातील टोमॅटोच्या पिकाला संकटाचा सामना करावा लागतो. पीक चांगले आणण्याचे शेतकºयांसमोर आव्हान असते. त्यासाठी शेतकरी आपल्याला शेतात विविध आधुनिक पद्धतीचे प्रयोग करतो. कोपर्डे हवेलीतील चव्हाण यांनी असाच एक प्रयोग अमलात आणला आहे.
बजरंग चव्हाण हे अनेक वर्षांपासून टोमॅटोचे शेतात उत्पादन घेतात. ते आपल्या शेतात सतत नवनवीन प्रयोग करत असतात. यंदा त्यांनी दीड ऐकर क्षेत्रावर टोमॅटो पिकाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी अकरा हजार रोपांची लागण करण्याचा निर्णय घेतला. तसेच प्रत्येक रोपांना त्या पीव्हीसी पाईपमध्ये लावण्याचे ठरविले. त्यांनी अकरा हजार पीव्हीसी पाईपचा वापर लावलेल्या रोपांमध्ये केला आहे. पाईपची उंची अडीच इंची असून, गोलकार पाईप दोन इंची आहे. त्यामध्ये रोपांची लागण केली. एक इंच पाईप जमिनीत खोल मातीत रुतवली. सरीतील अंतर सहा फुटांचे आहे. संपूर्ण सरीच्या भुंड्यावर मल्चिंग पेपरचा वापर केल्याने तणाचा बंदोबस्त होणार आहे. रोपांना पाणी देण्यासाठी ड्रीपचा वापर केला आहे.
त्यांना पाईपचा वापर करून त्यांना रोपाची मर टाळता येण्यात यश मिळाले आहे. तसेच उष्णतेपासून रोपांचा बचाव होत आहे. मूळ कुजवा, करपा आदी रोगांपासून पिकांची मुक्तता होत असल्याने पिकांची वाढ जोमदार झाल्याचे दिसत आहे. ड्रीपमधून पिकाला पाणी मिळत असल्याने पाण्याचा आणि खताचा मात्रा नियोजन पद्धतीने देण्यात
ते यशस्वी झाले आहेत. पाच फुटापर्यंत रोपाची वाढ होणार आहे. रोपांची सुरळीत वाढ झाल्यानंतर पाईप काढण्यात येणार असून, रोपांना यांत्रिक पध्दतीने मातीची भर लावली जाते. त्यांना एक लाख तीस हजार रुपये उत्पादन खर्च येणार आहे.
शेतीत व्यावसायिक पद्धतीचा वापर
दिवसेंदिवस शेतकरी व्यावसायिक पध्दतीने शेती करू लागलेत. मल्चिंग पेपरचा वापर, ड्रीपमधून पाणी देणे आदी गोष्टींचा वापर ते करू लागले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात मजुरांचा वापर खर्च कमी होत आहे. तर उन्हाचा रोपांच्यावर परिणाम होऊ नये म्हणून आता तर चक्क रोपांची लागण पाण्याच्या पाईपमध्येच करू लागले आहेत.
उन्हाळी टोमॅटोची बाग आणणे फार मोठे जिकिरीचे ठरत आहे. त्यामध्ये लहान रोपांची मर आणि रोगाचा प्रादूर्भाव हटविणे कठीणच. त्यासाठीच पाईपातच रोपांची लागण केली आहे. त्यामुळे मर टाळता आली असून, रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होत आहे.
- बजरंग चव्हाण, टोमॅटो उत्पादक शेतकरी, कोपर्डे हवेली