ताजी भाजी घेतली... आता जागाभाडे द्या!

By admin | Published: August 30, 2016 11:10 PM2016-08-30T23:10:46+5:302016-08-30T23:59:58+5:30

मलकापूरच्या मंडईतील अजब प्रकार : विक्रेत्याबरोबर खरेदीदाराकडूनही ‘वसुली’; जागा खासगी असल्याने नागरिकांच्या खिशाला चाट

Took fresh vegetables ... Now fill the room! | ताजी भाजी घेतली... आता जागाभाडे द्या!

ताजी भाजी घेतली... आता जागाभाडे द्या!

Next

कऱ्हाड : एखाद्या व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकाकडून किंवा विक्रेत्याकडून जागा मालक भाडे, डिपॉझिट घेतात, ही गोष्ट खरी; पण त्या विक्रेत्याकडे येणाऱ्या ग्राहकाकडून, खरेदीदाराकडून जागा मालकाने भाडे घेतले तर..! होय, असाच प्रकार सध्या मलकापूर येथे सुरू आहे. कृष्णा रुग्णालयानजीक खासगी जागेत भरणाऱ्या मंडईत अनेक विक्रेते व व्यावसायिक बसतात. त्यांच्याबरोबरच ग्राहकांकडूनही सध्या भाडे उकळले जात आहे. मात्र, नगरपंचायतीची मंडईसाठी स्वतंत्र जागा नसल्याने सारेच ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करतायत.
कऱ्हाड तालुक्यातील मलकापूर नगरपंचायत ही राज्यात नावाजलेली आहे. चोवीस तास पाणी योजनेमुळे या गावाचा लौकिक सर्वदूर पोहोचला आहे. मात्र, येथील खासगी जागेच्या मंडईत भाजी विकताना विक्रेत्यांच्या आणि खरेदी करताना ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळत नाही ना, याचा विचार नगरपंचायत कधी करणार, हा खरा प्रश्न आहे. मलकापूर ही मूळची ग्रामपंचायत; पण कऱ्हाड शहरालगतचे विस्तारलेले उपनगर म्हणून हे गाव नावारूपास आले. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा या शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली. सहा वर्षांपूर्वी ती नगरपंचायत झाली. शहराचा विकास साधण्यासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र, नगरपंचायतीला अजूनही मंडईसाठी जागा सापडलेली नाही. त्यामुळे त्याचा नाहक त्रास सर्वांनाच सोसावा लागत आहे.
मलकापूरची लोकसंख्या आणि शहराचा विस्तार पाहता येथे आगाशिवनगर, शास्त्रीनगर, भारती विद्यापीठ परिसर अशा दोन-तीन ठिकाणी भाजी मंडईची गरज नागरिक व्यक्त करतात. मात्र, एकासुद्धा भाजी मंडईसाठी नगरपंचायतीकडे जागा नसल्याने विक्रेते विशेषत: ग्रामीण भागातील शेतीमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. विक्रेता एक असला मात्र त्याच्याकडे दोन-तीन प्रकारच्या भाज्या विक्रीसाठी उपलब्ध असल्यास प्रकारागणीक हा खासगी भाजी मंडईचा जागा मालक भाडे आकारत आहे. शिवाय त्यातील कोणत्याही विक्रेत्याकडून एखाद्या खरेदीदाराने पाच किलोपेक्षा जास्त एकाच प्रकारचा माल खरेदी केला तर त्याने प्रवेशद्वारावर खुर्ची टाकून बसलेल्या मालकाला जाऊन सांगायचे आहे.
मग मालक त्याच्याकडूनही भाडे आकारत आहेत. यावरून वेळोवेळी संबंधित मालक व खरेदीदार यांच्यात खटके उडताना पाहायला मिळतात. पालिकेने स्वत:ची भाजी मंडईसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)


पैसे द्यायचे; पण पावती नाही
जागेचा मालक मंडईत बसणाऱ्या विक्रेत्याकडून, शेतकऱ्याकडून व जादा माल खरेदी करणाऱ्यांकडून भाडे, पैसे आकारत आहे. मात्र, यातील कोणालाच कसलीही पावती दिली जात नाही, हे विशेष. काही खरेदीदारांनी पावती मागितली तर त्याच्याशी अरेरावीची भाषा वापरली जाते. तसेच याबाबतचे कसलेही सूचना फलक येथे लावलेले दिसत नाहीत.
मलकापूरच्या भाजी मंडईचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नवीन विकास आराखड्यात हायवेच्या पूर्वेला आणि पश्चिमेला अशा दोन भाजी मंडईसाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून, येत्या डिसेंबर अखेरीस हा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास वाटतो.
- मनोहर शिंदे, उपनगराध्यक्ष, मलकापूर

गेल्या आठवड्यात मी मलकापूरच्या मंडईत भाजी खरेदी करण्यासाठी गेलो होतो. पाच किलो दोडका खरेदी केला. त्याचे पैसे त्या शेतकऱ्याला दिले. मात्र, प्रवेशद्वारावर मालकाने अडवून आमच्याकडून दहा रुपये मागितले. त्यावर कसले पैसे, अशी विचारणा केली असता जादा भाजी खरेदी केल्यावर येथे पैसे द्यावे लागतात, असे सांगून आमच्याकडून पैसे घेतले. मात्र, त्याची पावती दिली जात नाही.
- सुनील गाढवे,
खानावळ व्यावसायिक

Web Title: Took fresh vegetables ... Now fill the room!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.