‘सह्याद्री’साठी उच्चांकी २२४ अर्ज दाखल

By admin | Published: February 16, 2015 10:18 PM2015-02-16T22:18:03+5:302015-02-16T23:09:08+5:30

उंडाळकर समर्थकांचीही एन्ट्री : तिन्ही गटांच्या उमेदवारांच्या उत्साहाला उधाण

Top 224 nominations for Sahyadri | ‘सह्याद्री’साठी उच्चांकी २२४ अर्ज दाखल

‘सह्याद्री’साठी उच्चांकी २२४ अर्ज दाखल

Next

कऱ्हाड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक १७ मार्चला होत आहे. सोमवार, दि. १६ फेब्रुवारी रोजी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर, सहा गटांत तब्बल २२४ उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. सत्ताधाऱ्यांसह विरोधी गटाच्या उमेदवारांच्यातही यावेळी उत्साह पाहायला मिळाला.
सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासूनच येथील निवडणूक कार्यालयासमोर इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. शहर पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पहिले दोन दिवस अर्ज विक्री झाली खरी; पण एकही उमेदवारी अर्ज भरला गेला नाही. तिसऱ्या दिवशी काहीनी अर्ज भरले; मात्र आज शेवटच्या दिवशी उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी एकच गर्दी केली.
कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील यांनी आज दुपारी येथील पी. डी. पाटील प्रतिष्ठानच्या कार्यालयासमोर सभासदांना मार्गदर्शन केले आणि शक्तिप्रदर्शनासह ते दुपारी दोन वाजता निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात अर्ज भरण्यासाठी पोहोचले त्यांच्या अनेक समर्थकांनीही पी. डी. पाटील पॅनेलच्या वतीने अर्ज दाखल केले.
त्यानंतर काँग्रेसचे नेते धैर्यशील कदम यांच्यासह त्यांच्या सुमारे ६० समर्थकांनी प्रस्थापितांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले तर ‘स्वाभिमानी’चे मनोज घोरपडे यांच्यासह सुमारे ४८ समर्थकांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केले. भरीस भर म्हणून माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या सुमारे १७ समर्थकांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज भरले. त्यात पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठलराव जाधव, तांबवेचे माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णा पाटील, मसूरचे वसंतराव जगदाळे आदींचा समावेश आहे. त्यामुळे सुरुवातीस दुरंगी-तिरंगी वाटणारी ही निवडणूक नेमकी कोणत्या वळणावर जाणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली
आहे. (प्रतिनिधी)

भाऊ... लक्ष असू द्या !
दुपारी दोन वाजता अर्ज भरल्यानंतर आमदार बाळासाहेब पाटील निवडणूक कार्यालायातून बाहेर पडले, त्यावेळी नवग्रह मंदिरानजीक त्यांचे कार्यकर्ते उभे होते. त्यातील एकाकडे पाहून आमदार पाटील यांनी हात जोडत ‘भाऊ लक्ष असू द्या,’ अशी हाक दिली. त्यामुळे यंदा निवडणुकीत मतदार सभासदांचा ‘भाव’ वाढल्याची चर्चा उपस्थितांच्यात सुरू झाली.

Web Title: Top 224 nominations for Sahyadri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.