केंद्र अन् राज्य घरकुलात सातारा विभागात अव्वल, ७ तालुकेही सर्वोत्कृष्ट 

By नितीन काळेल | Published: February 26, 2024 07:22 PM2024-02-26T19:22:27+5:302024-02-26T19:24:13+5:30

चार ग्रामपंचायतींचाही होणार गौरव 

Top in Satara Division in Central and State Gharkul scheme | केंद्र अन् राज्य घरकुलात सातारा विभागात अव्वल, ७ तालुकेही सर्वोत्कृष्ट 

केंद्र अन् राज्य घरकुलात सातारा विभागात अव्वल, ७ तालुकेही सर्वोत्कृष्ट 

सातारा : अमृत महा आवास अभियान ग्रामीणमध्ये सातारा जिल्ह्याने विभागस्तरावर केंद्राच्या प्रधानमंत्री आणि राज्यपुरस्कृत घरकुल योजनेत अव्वल स्थान मिळविले आहे. त्याचबरोबर या योजनांतच जावळी, महाबळेश्वर, कऱ्हाड, सातारा, पाटण, कोरेगाव आणि माण तालुके तसेच चार ग्रामपंचायतीही सर्वोत्कृष्ट ठरल्या आहेत. यामुळे घरकुलमध्येही जिल्ह्याने यशाची परंपरा कायम राखली आहे.

केंद्र तसेच राज्य शासनाच्यावतीने पक्का निवारा नसणाऱ्या विविध समुहातील कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येतो. ही घरकुल योजना चांगल्या पध्दतीने राबविण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येतात. त्यासाठी पुरस्कारही दिला जातो. तर अमृत महा आवास अभियान ग्रामीण २०२२-२३ सुरू करण्यात आलेले आहे. याचा विभागस्तरीय निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये पुणे विभागात सातारा जिल्ह्याने सर्वच पातळीवर यशाचा डंका वाजविलेला आहे.

सर्वोत्कृष्ट जिल्हे या प्रकारात प्रधानमंत्री आवास ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत योजनेत साताऱ्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर सर्वोत्कृष्ट तालुके प्रकारात प्रधानमंत्री योजनेत जावळी, कऱ्हाड आणि सातारा तालुक्याने अनुक्रमे तीन क्रमांक प्राप्त केले. तसेच राज्य योजनेत महाबळेश्वर तालुक्याने प्रथम तर माणला तृतिय क्रमांक मिळाला. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतींसाठीही पुरस्कार होते. यामध्ये प्रधानमंत्री योजनेत कऱ्हाड तालुक्यातील येळगाव आणि पाटणमधील भुडकेवाडीने प्रथम तर पाटण तालुक्यातीलच काठी ग्रामपंचायतीने दुसरा क्रमांक मिळवला. राज्य योजनेत पाटणमधील बोंद्री ग्रामपंचायत प्रथम क्रमांकावर राहिली.

शासकीय जागा उपलब्धतेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत तीनही तालुके सातारा जिल्ह्यातील आहेत. कोरेगाव, सातारा आणि कऱ्हाड तालुक्याने अनुक्रमे क्रमांक मिळविला. तर वाळू उपलब्धतेत सर्वोत्कृष्ट कामगिरीत प्रधानमंत्री आणि राज्य पुरस्कृत योजनेतही पाटण तालुका प्रथम राहिला आहे. या यशाचा गाैरव सोहळा दि. १ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालातील मुख्य सभागृहात होणार आहे. दरम्यान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे तसेच त्यांच्या टीमने घरकुलात सतत कार्य केले. तसेच लोकांच्या घरकुलाबाबतीतील अडचणीही सोडविल्या. यामुळे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे.

Web Title: Top in Satara Division in Central and State Gharkul scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.