सर्वोत्कृष्ट संशोधन : सातारकर देशात अव्वल-संशोधक धीरज पवार यांचा दिल्लीत गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 11:55 PM2020-02-08T23:55:52+5:302020-02-08T23:56:30+5:30
या परिषदेमध्ये बेस्ट पोस्टर व बेस्ट पेपर सादरीकरण पुरस्कार डॉ. धीरज पवार यांना मिळाला. त्यांनी ‘तेलबिया पिकावरील बुरशीजन्य करपा रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन’ या विषयावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे केलेल्या संशोधनाचे सादरीकरण केले.
सागर गुजर ।
सातारा : उडतारे, ता. वाई येथील डॉ. धीरज विपिन पवार यांनी केलेल्या संशोधन कार्याचा दिल्ली येथे गौरव करण्यात आला. त्यांचे संशोधन संपूर्ण देशात अव्वल ठरले. तेलबियांवर पडणाऱ्या रोगांशी सामना करण्याच्या त्यांच्या तंत्रज्ञानाचा संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
‘देशात ७० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. पिकांवर पडणा-या वेगवेगळ्या रोगांचे नियंत्रण, करायची पद्धत वेगवेगळी आहे. रोग पडल्यानंतर रासायनिक औषधांची फवारणी केली जाते. ही बाब खर्चिक ठरते. पिकांचे नियोजन सुरुवातीपासूनच करणे आवश्यक आहे, तसे केल्यास रोगाला अटकाव बसून आर्थिक तोटा टाळता येईल,’ असे डॉ. धीरज पवार यांनी संशोधनाअंती सिद्ध कलेले आहे.
डॉ. पवार यांनी लसनाची पेस्ट, मित्र बुरशी यांचा उपयोग करून बीजप्रक्रिया केली. पेरणीआधीच बियांमध्ये काहीवेळा रोगाचे संक्रमण होते. त्यामुळे रोग वाढतो. बीजप्रक्रिया केल्याने रोग नियंत्रित करता येतो. लिंबोणी पाला, लसनाचा रस यांचे द्रावण रोग आटोक्यात आणू शकते. दोन वर्षे शेतात प्रात्यक्षिक घेतले. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.
दरम्यान, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली येथे भारतीय वनस्पती रोगशास्त्र संस्थेतर्फे ‘फायटोपॅथोलॉजी इन अचिव्हिंग यूएन सस्टेंशन डेव्हलपमेंट गोल्स’ या विषयावर दि. १६ ते २० जानेवारी या कालावधीत ७ व्या आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. या परिषदेमध्ये बेस्ट पोस्टर व बेस्ट पेपर सादरीकरण पुरस्कार डॉ. धीरज पवार यांना मिळाला. त्यांनी ‘तेलबिया पिकावरील बुरशीजन्य करपा रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन’ या विषयावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे केलेल्या संशोधनाचे सादरीकरण केले. यासाठी त्यांना शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.
डॉ. धीरज पवार हे स्वातंत्र्यसैनिक दिवंगत आनंदराव जगदेवराव पवार यांचे नातू व प्रगतशील शेतकरी विपीन आनंदराव पवार यांचे चिरंजीव आहेत.
- तेलबिया पिकांना फायदा
हवामानाच्या दृष्टीने राज्याचे ९ विभाग आहेत. भौगोलिक वातावरणानुसार पिके घेतली जातात. अवेळी पाऊस पडत असल्याने बुरशीजन्य रोग वाढून पिकाला नुकसान पोहोचते. कोरडवाहू भागात तेलबिया पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. ८० टक्के लोक शेतकरी ही पिके करतात. या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी डॉ. धीरज पवार यांचे संशोधन फायद्याचे ठरणार आहे.
शेतकरी मोठे भांडवल घालून तेलबिया पिके घेतात. वातावरणातील बदलांमुळे अनेकदा पिकांवर रोग पडल्यानंतर पिके वाया जाण्याची भीती असते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. माझ्या संशोधनामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट टळेल, याची मला खात्री वाटते.
- प्रा. डॉ. धीरज पवार,
बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठ, दापोली.