आगाशिव डोंगराला लागलेल्या वणव्यावर कोसळल्या जलधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:36 AM2021-05-01T04:36:39+5:302021-05-01T04:36:39+5:30
मलकापूर : ऐतिहासिक व पौराणिक महात्म्य असलेल्या आगाशिव डोंगराला वणवा लागल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. परंतु विघ्नसंतोषींनी लावलेल्या या ...
मलकापूर : ऐतिहासिक व पौराणिक महात्म्य असलेल्या आगाशिव डोंगराला वणवा लागल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. परंतु विघ्नसंतोषींनी लावलेल्या या वणव्यावर निसर्गानेच मात केली. पावसाच्या जलधारांनीच वणवा शांत केल्याने डोंगरावरील वनसंपदा वाचली आहे.
जखिणवाडी ता. कऱ्हाडच्या बाजूने आगाशिव डोंगराला मंगळवारी, २७ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आग लागली. त्यानंतर स्थानिकांसह जखिणवाडी मलकापूरचे पोलीसपाटील, वन विभागाचे वनपाल ए. पी. सवाखंडे, वनरक्षक रमेश जाधवर यांच्यासह कर्मचारी व निसर्गप्रेमींनी तातडीने डोंगरावर धाव घेतली. मात्र, या परिसरात वादळी पावसाला सुरुवात झाल्याने पावसाच्या सरींनीच आग आटोक्यात आणली. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
आगाशिव डोंगराला लागलेला वणवा मोठा होता. मात्र वेळीच निसर्ग धावून आला आणि वादळी पाऊस आल्याने वणवा शांत झाला. तीव्र उन्हाळ्यात पडलेल्या पावसामुळे आगाशिव डोंगर परिसरात निसर्ग ग्रुपने लावलेल्या सर्व झाडांना मोठा दिलासा मिळाला आहे.
(कोट)
डोंगरावर पर्यटनासाठी माणसांचा वावर सुरू असल्यामुळे त्यापैकी काही समाजकंटक बिडी, सिगारेट ओढतात. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत तीन ठिकाणी वणवा लागला होता. समजताच तातडीने जाऊन तो आटोक्यात आणला. तिन्ही वेळचे मिळून साधारणतः दहा ते बारा हेक्टर क्षेत्र जळाले असेल. आजही वणवा लागल्याचे समजताच तातडीने गेलो. मात्र पावसाला सुरुवात झाली आणि वणवा शांत झाला. त्यामुळे वनसंपदा वाचली.
- रमेश जाधवर, वनरक्षक
फोटो..
३०मलकापूर
आगाशिव डोंगराला मंगळवारी वणवा लागला. पावसाच्या जलधारांनीच वणवा शांत केल्याने डोंगरावरील वनसंपदा वाचली आहे.