साताऱ्यात ढगांच्या गडगडात वळीव बरसला, सलग चौथ्या दिवशी पावसाची हजेरी
By नितीन काळेल | Published: May 13, 2024 04:31 PM2024-05-13T16:31:06+5:302024-05-13T16:33:10+5:30
उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा
सातारा : जिल्ह्यातील वातावरणात मोठा बदल झाला असून चार दिवसांपासून वळवाचा पाऊस पडू लागला आहे. सोमवारीही सातारा शहरात ढगांच्या गडगडाटात रिमझिम स्वरूपात हजेरी लावली. तर जिल्ह्याच्या काही भागातही पाऊस पडला. दरम्यान, पाऊस आल्यानंतर सातारा शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.
सातारा जिल्हावासीयांना एप्रिल महिना कडक उन्हाशी सामना करावा लागला. सतत पारा ३९ अंशावर होता. तर मे महिना सुरू झाल्यानंतर ४० अंशावर तापमान गेले. यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झालेले. असे असतानाच मागील पाच दिवसापासून वातावरणात मोठा बदल झालेला आहे. ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्याचबरोबर वळवाचा पाऊसही पडू लागला आहे. ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. यामुळे नुकसानीच्या घटनाही घडत आहेत. पावसामुळे वातावरणात मोठा बदल होवून थंडगार वारे वाहत आहेत.
जिल्ह्यात सोमवारी सलग चौथ्या दिवशी वळवाचा पाऊस पडला. सातारा शहरात दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आभाळ भरून आले होते. त्यानंतर ढगांचा गडगड सुरू झाला आणि पावसाला सुरुवात झाली. रिमझिम स्वरूपात हा पाऊस पडला असलातरीही हवेत गारवा निर्माण झाला. तर सातारा शहराच्या पश्चिम भागातील परळी खोरे, पेट्री भागात चांगला पाऊस झाल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर जिल्ह्याच्या काही भागाची ढगाच्या गडगडाटात पावसाने चांगली हजेर लावली आहे. तरीही धो - धो पाऊस कोसळल्याशिवाय खरीप हंगाम पूर्व शेती मशागतीच्या कामांना वेग येणार नाही.