साताऱ्यात विजांच्या कडकडाटात दुसऱ्या दिवशीही वळवाचा पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 05:41 PM2023-04-14T17:41:09+5:302023-04-14T17:41:25+5:30
सातारा जिल्ह्यात मागील चार दिवसापासून उन्हाची तीव्रता वाढली होती. त्याचबरोबर उकाड्यातही कमालीची वाढ झालेली. अधून मधून ढगाळ वातावरणही तयार व्हायचे
सातारा : सातारा शहर आणि परिसराला शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास वळवाच्या पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाटात जवळपास अर्धा तास पाऊस पडत होता. यामुळे रस्त्यावरून पाणी वाहू लागले, तर रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांची तारांबळ उडत नुकसानही झाले. आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमांवर देखील पावसाचा परिणाम झाला. सलग दुसऱ्या दिवशी वळवाचा पाऊस पडला.
सातारा जिल्ह्यात मागील चार दिवसापासून उन्हाची तीव्रता वाढली होती. त्याचबरोबर उकाड्यातही कमालीची वाढ झालेली. अधून मधून ढगाळ वातावरणही तयार व्हायचे. त्यामुळे पावसाळा पोषक वातावरण तयार होत होते. गुरुवारी तर जिल्ह्यातील मान, खटाव, पाटण आणि महाबळेश्वर तालुक्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर पाटण तालुक्यातच एका ठिकाणी वीज पडण्याची घटना घडली. मात्र, सुदैवाने त्यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. सातारा शहरातही सायंकाळी साडेसहानंतर पाऊस झाला होता. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता.
शुक्रवारी सकाळपासूनच सातारा शहर आणि परिसरात उकडा तीव्र होता. बाराच्या सुमारास अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. त्यामुळे पाऊस लवकरच पडणार असा अंदाज होता. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास सातारा शहर आणि परिसरात आभाळ भरून आले. त्याचबरोबर ढगाचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. सव्वाचारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. प्रारंभी पावसाचे मोठमोठे थेंब पडू लागले. त्यानंतर बघता बघता पावसाने जोर धरला. सुमारे अर्धा तास पाऊस पडत होता. त्यामुळे रस्त्यावर पाणी वाहू लागले. तर खरेदीसाठी बाहेर पडलेल्या सातारकरांची त्रेधातिरपीट उडाली. छोट्या विक्रेत्यांचेही नुकसान झाले. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. तसेच पाराही घसरल्याचे चित्र आहे.
भुयारी गटार कामामुळे रस्त्यावर चिखल...
सातारा शहरातील अनेक भागात भुयारी गटाची कामे आणखी सुरू आहेत. त्यातच गटारात पाईप टाकूनही नंतर डांबरीकरण कामे झाली नाहीत. त्यामुळे रस्त्यावर आजही माती पडून आहे. परिणामी पाऊस झाला की रस्त्यावर चिखल होतो. त्यातून वाहन चालवणे आणि चालणेही अवघड झालेले आहे. यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे. त्यातच शुक्रवारीही पाऊस झाल्याने खोदलेल्या रस्त्यावर चिखलाचा राडारोडा झाला होता.