दरोडेखोरांचा सामूहिक अत्याचार!
By admin | Published: September 11, 2015 10:45 PM2015-09-11T22:45:08+5:302015-09-11T23:25:21+5:30
पतीदेखत कृत्य : सातारा-कोरेगाव रस्त्यावरील धक्कादायक घटना; पाऊण तास धुमाकूळ
सातारा : सातारा-कोरेगाव रस्त्यावरील बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीवर सुरक्षारक्षक म्हणून काम करत असलेल्या दाम्पत्याच्या झोपडीवर दहा ते बाराजणांनी शुक्रवारी पहाटे सशस्त्र दरोडा टाकला. एवढेच नव्हे तर घरात लुटालूट केल्यानंतर जाताना तीन दरोडेखोरांनी पतीला जिवे मारण्याची धमकी देत पत्नीवर सामूहिक अत्याचार केला. या घटनेमुळे पोलीस दल अक्षरश: हादरून गेले असून, दरोडेखोरांच्या तपासासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा-कोरेगाव रस्त्यावर एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्या बांधकामावर सुरक्षारक्षक म्हणून एक दाम्पत्य २४ तास निगराणी करत आहे. त्या दाम्पत्याला तेथे छोटीशी झोपडी टाकून देण्यात आली आहे. गुरुवारी रात्री १२ वाजता जेवण झाल्यानंतर ते दाम्पत्य झोपी गेले. दरम्यान, तीन वाजता दरवाजा ठोठावल्याचा त्यांना आवाज आला. त्यामुळे पतीने खिडकीतून बाहेर पाहिले असता सात ते आठ लोक होते. त्यांच्या हातात काठ्या, चाकू, गज होते. ‘दरवाजा उघडा. घरात काय असेल ते द्या; अन्यथा तुम्हाला सोडणार नाही,’ असे म्हणून काही दरोडेखोरांनी खिडकीच्या काचा फोडल्या. त्यानंतर खिडकीतून आत हात घालून त्यांनी कडी काढली. सहा ते सात दरोडेखोर घरात गेल्यानंतर पतीला चाकूचा धाक दाखवून एका जागेवर बसविले. त्यानंतर पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र, तसेच पतीच्या पँटच्या खिशातील दीड हजारांची रोकड दरोडेखोरांनी काढून घेतली. त्यानंतर पतीला जिवे मारण्याची धमकी देत तिघांनी पत्नीवर सामूहिक अत्याचार केला. हा प्रकार सुरू असताना दरोडेखोरांनी पतीच्या गळ्याला चाकू लावला होता. त्यामुळे त्यांना काहीच हालचाल करता आली नाही. पतीच्या डोळ्यांदेखत तिघांनी पत्नीवर अत्याचार केला. सुमारे पाऊण तास दरोडेखोरांनी त्यांच्या घरात धुमाकूळ घातला. जाताना त्यांनी पत्नीचा मोबाईल चोरून नेला. पहाटे उजाडल्यानंतर पीडित दाम्पत्याने संबंधित घरमालकाला फोन करून
या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांची धावाधाव सुरू झाली. पोलिसांनी नाकाबंदी करून दरोडेखोरांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो निष्फळ ठरला. (प्रतिनिधी)
कुत्र्यांमुळे एका ठिकाणी बेत फसला
या दाम्पत्याच्या घरावर दरोडा टाकण्यापूर्वी त्या दरोडेखोरांनी तेथूनच
जवळ असलेल्या एका घरावर दरोड्याचा बेत आखला होता; परंतु त्या ठिकाणी तीन-चार कुत्री होती.
या कुत्र्यांनी भुंकण्यास सुरुवात केल्यामुळे दरोडेखोरांनी या दाम्पत्याच्या घराकडे मोर्चा वळविला अन् पहिल्या ठिकाणी प्रयत्न अयशस्वी झाला.
दरोडेखोर बोलत होते तीन भाषा
सर्व दरोडेखोर २० ते २५ वयोगटांतील होते. आपापसांत ते हिंदी, मराठी आणि कन्नड भाषा बोलत होते. त्यांनी तोंडाला काळे रुमाल बांधले होते. पीडित महिलेने सांगितलेल्या वर्णनावरून दरोडेखोरांचे स्केच बनविण्यात येणार आहेत.
कृत्यानंतर कोल्ड्रिंक्सवर ताव
दरोडेखोरांनी हा घृणास्पद प्रकार केल्यानंतर तेथून जवळच असलेल्या एका निवृत्त अधिकाऱ्याच्या हॉटेलमध्ये प्रवेश केला. हॉटेलमधील कोल्ड्रिंक्सवर ताव मारून त्यांनी सर्व बाटल्या रिकाम्या केल्या. तसेच जाताना त्यांनी हॉटेलमधील सिलिंडर, शेगडी, टिकाव, खोरे असे साहित्य चोरून नेले.
दरोडेखोरांचे
ठसे सापडले !
यावेळी दरोडेखोरांनी घरात सुमारे पाऊण तास धिंगाणा घातला. त्यामुळे भिंतीवर, तसेच दरवाजावर ठसे आहेत का, हे तपासण्यासाठी महिला ठसेतज्ज्ञांची टीम घटनास्थळी रवाना झाली. महिला ठसेतज्ज्ञांना काही ठिकाणी दरोडेखोरांचे ठसे सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.