सासू-सुनेवर अत्याचार; भोंदूबाबा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 01:04 AM2017-12-06T01:04:43+5:302017-12-06T01:04:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा/पुणे : दैवी शक्तीच्या सहाय्याने कुटुंबाला झालेली बाधा दूर करतो, अशा बहाण्याने महिला व तिच्या सासूवर लैगिक अत्याचार केले व या कुटुंबाचे १२ वर्षे आर्थिक व शारीरिक शोषण करणाºया साताºयाच्या भोंदुबाबाला खडक पोलिसांनी अटक केली आहे़ २००४ सालापासून हा प्रकार सुरु होता़
हैदरअली रशीद शेख (वय ४७, रा़ कसवा हाईटस, गुरुवार पेठ, जि़ सातारा) असे या भोंदुबाबाचे नाव आहे़ याप्रकरणी कोंढवा येथील एका महिलेने फिर्याद दिली आहे़ १४ डिसेंबर २००४ ते २०१६ दरम्यान पुण्यातील गणेश पेठ, मोमीनपुरा, गुरुनानकनगर, कोंढवा, महाबळेश्वर, रत्नागिरी, श्रीवर्धन, महाड येथील हॉटेलमध्ये हा प्रकार घडला आहे़
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही मुळची सातारची आहे़ १९९९ साली तिचा विवाह झाला़ पतीचा पुण्यात व्यवसाय असल्याने ते पुण्यात स्थायिक झाले़ तिला २००३ मध्ये रक्ताच्या उलट्या होणे, बेशुद्ध होण, चक्कर येणे असा त्रास होत होता़ पुण्यातील अनेक नामांकित रुग्णालयांमध्ये उपचार केल्यानंतरही त्याचा काही परिणाम होत नव्हता़ तिच्या सासूला हैदरअली शेखकडे दैवी शक्ती असल्याचे समजल्याने ते शेखच्या संपर्कात आले़ त्याने या महिलेच्या पतीलाही आपल्या बोलण्यातून भुलविले़ त्यामुळे तो या शेखच्या नादी लागला़
गाडी, जमीन घ्यायची असेल तर तो शेख याच्या सल्ल्यानेच घेत असे़ आपल्या जाळ्यात तो आला असल्याचे शेख याच्या लक्षात आल्यावर त्याने या महिलेला आजार दूर करतो, त्यासाठी बाहेर जावे लागेल, असे सांगून वेगवेगळ्या ठिकाणी बोलवत असे़ त्यांच्याकडून वेळोवेळी मोठी रक्कमही घेत असे़ या महिलेबरोबरच त्याने तिच्या सासुचेही वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन त्यांच्यावर अत्याचार केले़ त्याचे त्याने व्हिडिओ शुटिंगही केले़ त्याने या कुटुंबाकडून ८ लाख रुपये, सातारा येथील फ्लॅट, तीन महागड्या मोटारी, मोटारसायकल, पुणे येथील आॅफिस स्वत:कडे घेतले़ ही महिला आणि सासु यांच्यानंतर त्याची नजर त्यांच्या १४ वर्षांच्या मुलीवर पडली़ तिच्याशीही त्याने शारिरीक लगट करण्याचा प्रयत्न केला़ या महिलेने त्याच्यासमोर मुलीला यायचे नाही असे सांगितले, तेव्हा त्याचे डोळे उघडले़ त्यानंतर त्यांनी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली़
इंजिनअर भुलला ४ थी पास भोंदुबाबाला
हैदरअली शेख हा केवळ चौथी पास आहे़ तर फिर्यादी यांचा पती सिव्हिल इंजिनिअर आहे़ असे असले तरी शेख याने या इंजिनिअरला पूर्णपणे आपल्या कब्जात घेतले होते़ शेख सांगेल, त्यानुसारच तो कोणती गाडी घ्यायची, कोणती जमीन घ्यायची की नाही, याचे व्यवहार करीत असत़ या भोंदुबाबाविषयी त्याच्या पत्नीने तक्रार केली होती़ पण, त्याचा या बाबावर इतका विश्वास होता की त्याने पत्नीच्या तक्रारीवर विश्वासच ठेवला नाही़ तो असे करणे शक्य नसल्याचे त्यांना सांगत असे़ आपल्याला त्याने हिप्नोटाईज केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले़