तब्बल ४५० तंटे निकालात
By admin | Published: July 6, 2014 11:08 PM2014-07-06T23:08:49+5:302014-07-06T23:15:48+5:30
बावधनचा इतिहास : ३० वर्षांपूर्वीचीही भांडणे मिटविण्यात समितीला यश
तानाजी कचरे ल्ल बावधन
राजकीयदृष्ट्या जागृत व सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या बावधन (ता. वाई) येथे तंटामुक्त समितीने केलेल्या पारदर्शक कारभारामुळे सुमारे तीस वर्षांपूर्वीचे प्रलंबित व किचकट तंट्यासह शेकडो तंट्यांचे निवारण करण्यात समितीला यश आले आहे. १४८ महसुली, ९० दिवाणी तर २२४ फौजदारी असे तब्बल ४६२ तंटे मिटवून गावाने नवा इतिहास रचला आहे.
पोलीस यंत्रणा व न्याय व्यवस्थेवरील वाढलेला ताण लक्षात घेता शासनाने राबविलेल्या महत्त्वकांक्षी तंटामुक्त अभियानाला वाई तालुक्यातही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. बावधनसारख्या राजकीयदृष्ट्या जागृत गावात हा या अभियानाचा श्री गणेशा झाला; पण मोठ्या लोकसंख्येच्या गावात अभियान यशस्वी होईल का? याबाबत शंका उपस्थित झाल्या. एकट्या बावधनची १६ हजार लोकसंख्या तर आसपासच्या बारा वाड्यांची काही हजारात, त्यामुळे ऐकेकाळी तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या बावधनकरांनी बोलू ते करू, हे चित्र पाहावयाला मिळाले. मोठ्या संख्येच्या गावात स्वभाविकपणे तंटेही लक्षणीय होते. यामुळे दिवसाआड कोर्ट-कचेरी ठरलेली अनेकवेळा वाढत्या तंट्याने गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता.
या पार्श्वभूमीवर २००७ मध्ये तंटामुक्त अभियान उदयाला आले अन् गावाची परिस्थितीच बदलून गेली. गेल्या सात वर्षांपासून गावात तंटामुक्त समितीचे काम प्रामाणिकपणे सुरू आहे. गेल्या दोन वर्षांत तर समितीने एक पाऊल पुढे टाकले आहे. २० ते ३० वर्षांत जे न्यायालयात घडले नाही ते समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नातून घडले आहे. जे तंटे मिटूच शकत नाहीत, असे शेकडो महसूल, बांधकाम, दिवाणी व फौजदारी तंटे आपआपसात तडजोडी करून मिटवले आहेत. केवळ बावधन गावातील नव्हे तर आजूबाजूंच्या वाड्यांचे तंटेही या समितीने सहजरीत्या मिटविले आहेत.योग्य मार्गदर्शन, युक्तिवाद व दोन्हीकडील लोकांना पटवून सांगायचे कौशल्य, यामुळे १४८ महसुली, ९० दिवाणी तर २२४ हून अधिक फौजदारी तंटे निकाली काढण्यात आले आहेत.
पोलीस प्रशासनानेही समितीच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. महाराष्ट्रातील मोठ्या गावांनी आदर्श घ्यावा असे काम बावधनच्या तंटामुक्त समितीने केले आहे.