ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सातारा तालुक्यातून एकूण ६९ अर्ज, उमेदवारांची धांदल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 04:57 PM2022-12-01T16:57:09+5:302022-12-01T16:57:45+5:30
सातारा जिल्ह्यातील ३९ गावांमध्ये निवडणुका होत असून, अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे
सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी सातारा तालुक्यातून सरपंच पदासाठी १०, तर सदस्य पदासाठी ५९ असे एकूण ६९ अर्ज प्राप्त झाले. अर्ज भरण्यासाठी एकच दिवस उरले असल्याने मोठ्या संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
सातारा जिल्ह्यातील ३९ गावांमध्ये निवडणुका होत असून, अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी मान्याची वाडी येथून ग्रामपंचायत सदस्य पदासाठी सदस्य एक अर्ज, आसनगाव येथून सदस्य पदासाठी पाच, सरपंच पदासाठी एक अर्ज प्राप्त झाला. अपशिंगे येथे सदस्य पदासाठी एक व सरपंच पदासाठी एक अर्ज दाखल झाला. आंबेवाडी ग्रामपंचायतीतून सदस्य पदासाठी सहा, तर सरपंच पदासाठी एक अर्ज दाखल झाला.
साबळेवाडीत सदस्य पदासाठी एक, म्हसवे ग्रामपंचायत सदस्य पदासाठी एक, मर्ढे येथे सदस्य एक अर्ज दाखल झाले आहेत. केळवली सांडवली सदस्य दोन अर्ज दाखल झाले आहेत. कामेरी येथून सरपंच पदासाठी एक अर्ज दाखल झाला आहे. आरळे येथे सदस्य पदासाठी दोन व सरपंच पदासाठी एक अर्ज दाखल झाला. करंजे तर्फ परळीत सदस्य पदासाठी तीन अर्ज दाखल झाले आहेत.
राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण देगाव येथे सदस्य पदासाठी १६, तर सरपंचपदासाठी दोन अर्ज दाखल झाले. काशीळ येथेही सदस्य पदासाठी १५ अर्ज दाखल झाले. वडूथला सरपंच पदासाठी एक अर्ज दाखल झाला आहे. जैतापूरला सदस्य पदासाठी ४, सरपंच पदासाठी १ अर्ज, तर सोनगाव तर्फ सातारा येथे सदस्य पदासाठी एक व सरपंच एक अर्ज दाखल झाले आहेत.
अर्ज दाखल करण्याची मुदत दि. २ डिसेंबरला संपत आहे. यानंतर प्राप्त अर्जांची छाननी दि. ५, तर अर्ज मागे घेण्याची मुदत दि. ७ रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. दि. १८ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे, तर मतमोजणी दि. २० रोजी होणार आहे.