फुलांच्या गावी शाळा, महाविद्यालयांच्या सहली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 11:03 PM2018-09-30T23:03:13+5:302018-09-30T23:03:18+5:30
पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कास पठारावर पर्यटनासाठी राज्यासह देश-विदेशातून पर्यटक येत आहेत. तसेच पठारावरील विविधरंगी फुलांचे गालिचे असणाऱ्या फुलांच्या गावी अर्थात कास पठारावर निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी शाळा-महाविद्यालयांच्या सहली मोठ्या प्रमाणावर भेटी देत
आहेत.
आत्तापर्यंत हजारो पर्यटकांनी कास पठाराला भेट दिली
आहे. दरम्यान, कास-महाबळेश्वर मार्गावरील तीन किलोमीटर अंतरावरील पांढºया शुभ्र कुमुदिनी फुलांचे पर्यटकांना आकर्षण होऊ लागल्याने पायी चालत या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक फुलांची पर्वणी स्वानुभवताना दिसत
आहेत. दरम्यान, ड्रॉसेरा हे दुर्मीळ फुलंदेखील पर्यटकांना दर्शन देऊ लागली
आहेत.
पठारावर सतत पर्यटकांची रेलचेल सुरू आहे. ठिकठिकाणी गाईड पर्यटकांना येथील दुर्मीळ फुलांचे व वनस्पतींसंदर्भात मार्गदर्शन करीत आहेत. पठारावरील जैवविविधता पाहता कास पठाराची ख्याती जगभर पसरलेली आहे. जिल्ह्याला लाभलेले कास पठार हे निसर्गाचे वरदान आहे. कित्येक पर्यटक येथील फुलांसमवेत आपल्या आठवणी कायम स्मरणात राहाव्यात, यासाठी येथील मनाला मोहिनी घालणारे दृश्य कॅमेºयात कैद करताना दिसत आहेत. काल रविवारी कॉलेज व शाळांना सुटी असल्याने कास पठारारील सौदर्य पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
कुमुदिनी नायफांडिस इंडिका !
महाराष्ट्राच्या पश्चिम भागात काही ठिकाणी छोटी तळी आहेत. तळ्यात पाणी असेल अशा भागात पानभोपळी वनस्पती आढळते. यालाच कुमुदिनी किंवा छोटे कमळ म्हणतात. याचे पान पाण्यावर तरंगते, त्यावर पांढरी केसरयुक्त फुले येतात. याची मुळे पाण्यातून माती भागांपर्यत अन्न घेण्याकरिता तरंगतात. वेल, तणांमार्फत दुसरे रोप तयार होते. उन्हाळ्यात पाणी आटून गेल्यानंतर मुळ्या व कंद जमिनीत सुकतात. पुन्हा पावसाळा आला की जिवंत होतात.
कुमुदिनी तलाव हाऊसफुल्ल !
कास पठारावर परदेशी पाहुणे देखील येथील फुलांचा नजराणा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने दाखल होऊ लागले आहेत. जपान, नॉर्वे आदी देशातील पर्यटकांनी पठाराला भेट देऊन येथील दुर्मीळ फुलांचे कौतुक केले आहे. तसेच तीन किलोमीटर अंतर पायी चालत विदेशी पर्यटकांची पावले कुमुदिनी तलावाकडे वळत आहेत.
मोठी गौळण (पोगॅस्टमन डेकनांसिस)
सप्टेंबर महिन्यात पाणी साचते व आटते. अशा ठिकाणी ही वनस्पती दिसते. त्यावर लहान पानांमधून तुरा येतो. याची फुले निळसर रंगाच्या तुºयापमाणे असतात. घरातील तुळशीच्या मंजिरी ज्याप्रमाणे दिसतात. त्याप्रमाणे याचे तुरे दिसतात. म्हणून याला निळी मंजिरीदेखील म्हणतात.