पर्यटकांची रात्र बसस्थानकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:35 AM2018-05-28T00:35:57+5:302018-05-28T00:35:57+5:30

Tourist night bus stand | पर्यटकांची रात्र बसस्थानकात

पर्यटकांची रात्र बसस्थानकात

Next


महाबळेश्वर : पर्यटकांचा मे महिन्यातील शेवटचा हंगाम असल्याने महाबळेश्वर व पाचगणीला अक्षरश: यात्रेचे स्वरूप आले आहे. शनिवार व रविवारी दोन्ही पर्यटनस्थळे गर्दीने बहरून गेली. दरम्यान, येणाऱ्या पर्यटकांना राहण्यासाठी हॉटेल्स उपलब्ध न झाल्याने पर्यटकांना अख्खी रात्र बसस्थानक व परिसरात काढावी लागली. हॉटेलच्या दरांमध्ये अचानक वाढ झाल्याने काही पर्यटकांमधून नाराजीही व्यक्त करण्यात आली.
निसर्गाने मुक्त हस्त उधळण केलेल्या महाबळेश्वर व पाचगणीत देशभरातील पर्यटक पर्यटनासाठी दाखल झाले आहेत. बाजारपेठेसह सर्वच प्रेक्षणीय स्थळे गर्दीने फुलून जात आहेत. राज्यात सर्वत्र तापमान वाढ झाली असताना वेण्णा लेक परिसरांत मात्र सायंकाळी दाट धुके पसरत आहेत. या आल्हाददायक वातावरणाचा पर्यटक मनमुराद आनंद लुटत आहेत. महाबळेश्वरातील ब्रिटिशकालीन पॉर्इंटही पर्यटकांनी गजबजून जात आहेत.
दरम्यान, शनिवार व रविवार सलग सुट्यांमुळे महाबळेश्वर गुजराती पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. निवाºयासाठी हॉटेल उपलब्ध न झाल्याने शेकडो पर्यटकांना शनिवारी रात्री बसस्थानक परिसरात झोपावे लागले. रविवारी काही हॉटेलचे रूम रिकामे झाल्यानंतर या पर्यटकांच्या निवाºयाची व्यवस्था झाली. दरम्यान, उन्हाळी हंगामाचा शेवटचा आठवडा असल्याने सर्वच हॉटेलचे रूम्स भाडे दुप्पट, तिप्पट झाल्याने पर्यटकांमधून नाराजीचे सूर उमटले. पर्यटकांची संख्या पाहता दोन दिवसांमध्ये खरेदी-विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल झाली.
मॅप्रो गार्डनजवळ वाहतूक कोंडी
काही पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडी ही नित्याचीच समस्या बनली आहे. वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना पर्यटकांची दमछाक होत आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस दलाच्या वतीने मोठा फौजफाटा शहरात ठिकठिकाणी तैनात करण्यात आला आहे. या पोलिसांच्या वतीने वाहतूक निवारणाचे काम केले जात असले तरी महाबळेश्वर-पाचगणी मार्गावर असलेल्या मॅप्रो गार्डन येथे पर्यटकांना वाहतूक कोंडी तासनतास ताटकळत बसावे लागत आहे. त्यामुळे पर्यटकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Web Title: Tourist night bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.