सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली; महाबळेश्वर, पाचगणीला यात्रेचे स्वरूप 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 04:15 PM2022-12-31T16:15:29+5:302022-12-31T16:17:53+5:30

कोरोनामुळे पर्यटकांना सलग दोन वर्षे नववर्ष उत्साहात साजरे करता आले नव्हते.

Tourist places in Satara district were thronged with tourists; Huge crowd at Mahabaleshwar, Pachagani | सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली; महाबळेश्वर, पाचगणीला यात्रेचे स्वरूप 

सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली; महाबळेश्वर, पाचगणीला यात्रेचे स्वरूप 

googlenewsNext

सातारा : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्ष साजरे करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांनी अक्षरश: गजबजून गेली आहेत. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर व पाचगणीला पर्यटकांमुळे यात्रेचे स्वरूप आल्याने हॉटेल व्यावसायिक, व्यापारी व विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कोरोनामुळे पर्यटकांना सलग दोन वर्षे नववर्ष उत्साहात साजरे करता आले नव्हते. यंदा तशी परिस्थिती नसल्याने देशभरातील पर्यटक पर्यटनासाठी घराबाहेर पडले आहेत. यामध्ये महाबळेश्वर व पाचगणीला येणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक असून, ही पर्यटनस्थळे गजबजून गेली आहेत.

वर्षातला शेवटचा हंगाम असल्याने हॉटेल व्यावसायिकांकडून हॉटेलच्या दरात काहीअंशी वाढ करण्यात आली आहे. याचा पर्यटकांना मात्र थोडा फटका बसत आहे. आधीच दरवाढ त्यात राहण्यासाठी हॉटेल उपलब्ध होत नसल्याने अनेक पर्यटक ‘वन डे ट्रीप’चे नियोजनदेखील करत आहेत. येथील ब्रिटिशकालीन पॉईंट, वेण्णा जलाशय व मुख्य बाजारपेठ पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. हॉटेल व दुकानांना केलेल्या विद्युत रोषणाईमुळे येथील मुख्य बाजारपेठ उजळून निघत आहे. महाबळेश्वर पाठोपाठ तापोळा, धोम जलाशय, कास, बामणोली या पर्यटनस्थळांनाही पर्यटक पसंती देत आहेत.

हॉटेल व्यावसायिकांकडून खास सवलती

नववर्षाच्या स्वागतासाठी सातारा जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक सज्ज झाले आहेत. नागरिकांना आकर्षित करण्यासाठी या व्यावसायिकांकडून खाद्यपदार्थांवर वेगवेगळ्या सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. कुठे गाण्यांचे तर कुठे ऑक्रेस्ट्राचे आयोजनदेखील करण्यात आले आहे.

कोणाचे पर्यटन तर कोणाचे तीर्थाटन

निसर्गाच्या सानिध्यात मौजमस्ती करण्याकडे तरुणाईचा कल वाढला असला तरी बहुतांश कुटुंब पर्यटनस्थळांना भेट देण्याऐवजी तीर्थाटनाला जाणे पसंत करतात. सातारा जिल्ह्यातील मांढरदेव, औंधची यमाईदेवी, वाईतील महागणपती, मेरूलिंग, श्रीक्षेत्र महाबळेश्वर, पुसेगाव, शिंगणापूर अशा ठिकाणी नववर्ष साजरे करण्याचे नियोजनही अनेकांनी केले आहे.

अडीच हजार पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक

सण, उत्सव निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी पोलिस दलाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते. ३१ डिसेंबरला जिल्ह्यातील पर्यटनस्थळांसह ठिकठिकाणी मोठी गर्दी होणार आहे. यादिवशी तरुणाईकडून मद्यप्राशन करून धिंगाणा घातला जातो. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस दलाकडून जिल्ह्यात तब्बल अडीच हजार पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

पण थोडी काळजी घ्याच

  • चीनमध्ये कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करण्याची निर्देश दिले आहेत.
  • नागरिकांनी आनंद साजरा करतानाच स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षेचीदेखील काळजी घ्यायला हवी.
  • गर्दीच्या ठिकाणी तसेच पर्यटन स्थळांवर वावरताना मास्कचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
  • याव्यतिरिक्त जंगलात, डोंगरांवर, धरण परिसरात अथवा रस्त्याकडेला कुठेही पार्टी करू नका. असे कृत्य करताना आढळल्यास पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाणार आहे.

Web Title: Tourist places in Satara district were thronged with tourists; Huge crowd at Mahabaleshwar, Pachagani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.