पर्यटकांच्या स्वागतासाठी नंदनवन झाले सज्ज...
By admin | Published: May 6, 2016 12:17 AM2016-05-06T00:17:55+5:302016-05-06T01:19:41+5:30
उन्हाळी हंगामास प्रारंभ : महाबळेश्वरमध्ये निवासस्थाने आरक्षित
महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील संपूर्ण परिसर मे महिन्यात पर्यटकांच्या गर्दीत हरवून जातो. सध्या मे महिना सुरू झाला असून, शनिवारपासून पर्यटकांचा खऱ्या अर्थाने मुख्य व उन्हाळी हंगाम सुरू होत आहे. पर्यटकांची संख्या लक्षात घेता पोलिसांच्या वतीने येथील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. पर्यटकांकडून येथील निवासस्थाने आरक्षित झाली आहेत. एका अर्थान महाराष्ट्राचे नंदनवन पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.
महाबळेश्वर हे पर्यटकांना नेहमीच खुणावत असते. दरवर्षी लाखो देशीविदेशी पर्यटक महाबळेश्वरला भेट देतात. परंतु पर्यटकांचा मुख्य हंगाम मे महिन्यात असतो. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या असून, महाबळेश्वरमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे. कडक उन्हाळ्यात महाबळेश्वरचा पारा दुपारी चांगलाच गरम असतो. ३१ अंशांवर पारा गेलेला आहे. तर सायंकाळी सहा वाजल्यानंतर थंड हवेत फिरण्याचा आनंद पर्यटक घेतात. मे हा महाबळेश्वरवासीयांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा महिना आहे. यावेळी पर्यटकांची संख्या सर्वाधिक असते. महाबळेश्वरला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये गुजराती पर्यटकांची संख्या अधिक असते. देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक महाबळेश्वर नगरीत दाखल होत असतात.
सध्या महाबळेश्वरच्या उन्हाळी हंगामास प्रारंभ झाला आहे. मे महिन्यामध्ये महाबळेश्वर शहर व परिसर पूर्णपणे गजबजून जातोे. मे महिन्यामधील आता येणारा पहिला शुक्रवार, शनिवार व रविवार असल्याने पर्यटकांची चांगलीच वर्दळ दिसून येणार आहे. त्यानंतर पुढे हा हंगाम वाढतच जाणार आहे. पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. तरी या हंगामाच्या पूर्वतयारीमध्ये पोलिस प्रशासन व महाबळेश्वर नगरपालिका यांनी शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीसाठी ठोस नियोजन केलेले आहे. या हंगामामध्ये महाबळेश्वर परिसरातील निवासस्थाने पर्यटकांकडून आरक्षित झाली आहेत. वाहतूक व वाहनतळ व्यवस्था पर्यटकांसाठी व स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरणार नाही. याचे नियोजन पोलिस निरीक्षक राजेंद्र राजमाने यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
वाहतूक पोलिसांची अतिरिक्त कुमक
महाबळेश्वर व पाचगणीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. पर्यटकांची हजारोंच्या संख्येने येणारी वाहने महाबळेश्वरात हंगामावेळी दाखल होतात. त्यामुळे वेण्णा लेक, मुख्यबाजारपेठ, शिवाजी चौक, सुभाष चौक, तसेच विविध प्रेक्षणीय स्थळावरसुद्धा वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर होते. परिणामी पर्यटक व स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांना मे महिन्याच्या हंगामामध्ये तासनतास रांगेत उभे राहावे लागते. यासाठी महाबळेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र राजमाने यांनी महाबळेश्वरच्या कोंडीचा अभ्यास करून महाबळेश्वर शहर व पॉइंट परिसरात साताराहून वाहतूकपोलिसांची अतिरिक्त कुमक मागविली आहे. हंगामासाठी सातारा येथून महाबळेश्वरमध्ये २० कर्मचारी आले आहेत. महाबळेश्वर पोलिस ठाण्यात एकूण कर्मचारी संख्या ४६ आहे. तर त्यातील ३६ हजर असतात.