पर्यटकांना लुटता येणार जंगल सफारीचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:26 AM2021-06-11T04:26:30+5:302021-06-11T04:26:30+5:30
महाबळेश्वर : ‘महाबळेश्वरच्या सहलीवर येणाऱ्या लाखो पर्यटकांना आता यापुढे जंगल सफारीचा आनंद लुटता येणार आहे,’ अशी माहिती साताऱ्याचे उपवनसंरक्षक ...
महाबळेश्वर : ‘महाबळेश्वरच्या सहलीवर येणाऱ्या लाखो पर्यटकांना आता यापुढे जंगल सफारीचा आनंद लुटता येणार आहे,’ अशी माहिती साताऱ्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिली.
हिरडा विश्रामगृहावर गुरुवारी संयुक्त वनव्यवस्थापन महासमिती व वनविभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत जंगल सफारीचा निर्णय घेण्यात आली. जंगलाची माहिती असणारा स्थानिक वाटाड्या अथवा गाइड हा पर्यटकांना सोबत घ्यावा लागणार आहे. त्याचप्रमाणे वनविभागाच्या भागातील पाॅइंटची देखभाल दुरुस्ती करणे, दुर्लक्षित पाॅइंटचे सुशोभीकरण करणे, जंगलातील प्राण्यासाठी इकोफ्रेंडली पाणवठे तयार करणे, गव्याचा उपद्रव कमी व्हावा, यासाठी गवताचे कुरण विकसित करणे, पर्यटकांच्या माहितीसाठी माहिती फलक लावणे, पाॅइंटवरील सुका कचरा वाहतुकीसाठी स्वतंत्र वाहन खरेदी करणे, वनविभागांची विश्रामगृहे ही संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्यावतीने चालविण्यासाठी हस्तांतर करणे आदी महत्त्वाचे निर्णयही या बैठकीत घेण्यात आले.
राज्य शासनाच्या सूचनेनुसार लाॅडविक पॉइंट ते किल्ले प्रतापगड रोप वे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या मार्गावरील अडथळे दूर करण्याच्या निर्णयाबरोबर पर्यटनवाढीसाठी आवश्यक असलेला विकासकामाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्याचा निर्णय उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी या बैठकीत घेतला. या बैठकीला वनक्षेत्रपाल दिलीप झगडे, शांताराम धनावडे, पंढरीनाथ लांगी, एस. एस. कमलेकर, टी. एस. केळगणे, राजेंद्र चोरमले, एल. डी. राऊत, ए. डी. कुंभार उपस्थित होते. महासमितीच्या वतीने अनिल भिलारे यांनी त्यांचे स्वागत केले. विजय भिलारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
चौकट :
हिलदारी संस्थेची घेणार मदत..
महाबळेश्वरमधील पॉइंटवरील कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. यासाठी ‘हिलदारी’ या संस्थेची मदत घेण्यात येणार आहे. या बैठकीत हिलदारीचे प्रकल्प अधिकारी डॉ. मुकेश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.