'कास'च्या जैवविविधतेला पर्यटकांमुळे हानी, टेरीच्या अहवालातून 'दे धक्का'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 10:53 PM2022-03-01T22:53:33+5:302022-03-01T22:58:02+5:30

टेरीचा अहवाल. वर्षभर पर्यटनासाठी नियोजन आवश्यक

Tourists damage Kas's pathar biodiversity, Terry reports of satara | 'कास'च्या जैवविविधतेला पर्यटकांमुळे हानी, टेरीच्या अहवालातून 'दे धक्का'

'कास'च्या जैवविविधतेला पर्यटकांमुळे हानी, टेरीच्या अहवालातून 'दे धक्का'

googlenewsNext

दीपक शिंदे                                                                                                                                                               

सातारा : कास पठारावर ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. हाच कालावधी याठिकाणची जैवविविधता बहरात येण्याचा असतो. त्यामुळे त्यावर अतिरिक्त पर्यटकांचा विपरीत परिणाम होत असून, काही वनस्पती नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे याठिकाणचे पर्यटन आजूबाजूच्या ठिकाणी विभागले गेले तर स्थानिकांना अधिक फायदा होईल, असा अहवाल कास आव्हाने आणि संधी या विषयावर अभ्यास करणाऱ्या टेरी या संस्थेने प्रसिद्ध केला आहे. राज्य आणि केंद्र सरकार तसेच युनेस्कोलाही हा अहवाल सादर करण्यात येणार आहे.

कास हे जागतिक वारसा केंद्र आहे. याठिकाणी आढळणाऱ्या विविध वनस्पती इतर कोणत्याही भागात आढळत नाहीत. मात्र, मागील काही वर्षात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. २०२० साली कोरोनामुळे पर्यटकांची संख्या कमी झाली होती. मात्र, २०१९ मध्ये एक लाख २ हजार ८५३ पर्यटकांनी भेट दिली होती. यातील ९७ हजार ५५८ पर्यटकांनी फक्त कास पठाराला भेट दिली आहे.

कासच्या आजूबाजूलाही पर्यटनासाठी अनेक चांगल्या जागा आहेत. त्याठिकाणीही मोठ्या प्रमाणावर पर्यटन होऊ शकते. याचा विचार करून वर्षभर या भागात कसे पर्यटन राहील याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचेही टेरीने आपल्या अहवालात म्हटले आहे. पर्यावरणाबाबत पदव्युत्तर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा अहवाल पर्यावरण तज्ज्ञांच्या मार्गदर्शज्तखाली बनविला आहे. त्यांना रानवाटाचे संदीप श्रोत्री, डॉ. अपर्णा वाटवे, प्रेरणा अग्रवाल, निवृत्त वनपाल श्रीरंग शिंदे, वनविभाग आणि वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांचे सहकार्य मिळाले.

पर्यावरण आणि सुधारणा या दोन विरोधाभास असलेल्या संकल्पना नाहीत तर त्या एकाच बाजूच्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करतच सुधारणा होणे आवश्यक आहेत. तेव्हाच जीवसृष्टीचे योग्य रक्षण होऊ शकेल.
- राजेंद्र शेंडे, अध्यक्ष, टेरी

टेरीच्या अहवालातील चार महत्त्वाच्या बाबी
१. २०२० मध्ये पर्यटक कमी झाल्याने गवताच्या काही प्रजातींमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही ठोस उपाययोजना कराव्या लागतील.

२. गेल्या काही वर्षांपासून कासवर पर्यटकांच्या संख्येमुळे फुलांवर परिणाम झाला आहे. हा परिणाम टाळण्यासाठी पर्यटनावर नियंत्रण असायला हवे आणि फुलांच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी निसर्गावर आधारित पर्यटनाला प्राधान्य दिले जावे.

३. पठारावर चराईसाठी येणाऱ्या जनावरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्याचा फुलांच्या फुलण्यावरही परिणाम होत आहे. याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन काम करणे आवश्यक आहे.

४. संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या मदतीने या भागातील पर्यटन वाढीसाठी आणि स्थानिकांना रोजगार निर्माण होण्यासाठी मदत होणे आवश्यक आहे.
 

Web Title: Tourists damage Kas's pathar biodiversity, Terry reports of satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.