कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात पर्यटकांना आधुनिक बोटिंगचा थरार अनुभवायला मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 02:27 PM2022-06-18T14:27:11+5:302022-06-18T14:27:54+5:30
बामणोल : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात राज्य शासनाचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाकांक्षी प्रकल्प स्कूबा डायव्हिंग उभारला जात ...
बामणोल : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात राज्य शासनाचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाकांक्षी प्रकल्प स्कूबा डायव्हिंग उभारला जात असून या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मुनावळे-वाघळी ता. जावळी या परिसरातील शिवसागर जलाशयाची बुधवारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकारी जयश्री भोज यांच्यासमवेत पाहणी केली. प्रांताधिकारी मीनाज मुल्ला, जावळी तहसीलदार राजेंद्र पोळ, वन समितीचे किसन भोसले यावेळी उपस्थित होते.
सध्या शिवसागर जलाशयाची पाणी पातळी कमालीची घटली असल्याने हे सर्व अधिकारी गुडघाभर चिखलातून वाट काढत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या बोटीतून नदीपात्रात जाऊन शिवसागर जलाशयातील पाणी पातळी व परिसराची त्यांनी पाहणी केली. स्कूबा डायव्हिंग प्रकल्प येथे उभारल्यावर पर्यटकांना आधुनिक बोटिंगचा थरार अनुभवायला मिळणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. भल्या सकाळी हा सर्व अधिकारी वर्ग मुनावळे येथे आला होता. येथील स्कूबा डायव्हिंग परिसराची पाहणी केल्यावर संबंधित सर्व खात्यातील अधिकाऱ्यांची दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.