भूस्खलनात कोसळलेला मनोरा उभारला; पण भीती कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:44 AM2021-08-12T04:44:12+5:302021-08-12T04:44:12+5:30
ढेबेवाडी : भूस्खलनामुळे धोका निर्माण झालेल्या ढेबेवाडी विभागातील शिंदेवाडी, जितकरवाडी, भातडेवाडी, धनावडेवाडी या डोंगर कुशीत वसलेल्या गावातील नागरिकांना तात्पुरते ...
ढेबेवाडी : भूस्खलनामुळे धोका निर्माण झालेल्या ढेबेवाडी विभागातील शिंदेवाडी, जितकरवाडी, भातडेवाडी, धनावडेवाडी या डोंगर कुशीत वसलेल्या गावातील नागरिकांना तात्पुरते सुरक्षितस्थळी हलवून थोडासा दिलासा दिला. मात्र अजूनही जितकरवाडी येथील डोंगराची घसरण सुरूच आहे. धोकादायक बनलेला विजेचा मोठा मनोरा कोसळून घरांना धोका निर्माण होण्याची शक्यता होती. पण ही बाब लक्षात घेऊन तो मनोरा दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने जितकरवाडीचा तो धोका टळण्यास मदत झाली आहे.
जितकरवाडी येथील डोंगरातील माती, दगड-गोटे ढासळत असल्याने मनोराही कलला होता. याबाबत ‘लोकमत’च्या शनिवार, दि. ७ ऑगस्टच्या अंकात वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेऊन वीज वितरण कंपनीने दुरुस्तीस सुरुवात केली आहे.
ढेबेवाडी विभागातील वाल्मीक पठारावरील सर्वच गावांना मुसळधार पाऊस आणि महापुराचा फटका बसला. रस्ते, पूल, साकव आणि अन्य दळणवळण सुविधाच वाहून गेल्याने जनसंपर्कच तुटला, तर काही गावांना भूस्खलनाचा धोका निर्माण झाला. यामध्ये जितकरवाडी, भातडेवाडी, धनावडेवाडी शिंदेवाडी या गावातील कुटुंबाचे जिंती येथील माध्यमिक शाळा आणि ढेबेवाडी येथील मंगल कार्यालय येथे तात्पुरते स्थलांतर केले आहे.
सर्व नागरिक पंधरा दिवसांपासून घरदार सोडून बाहेर राहिले आहेत. सामाजिक संघटनांकडून त्यांना मदतही मिळत आहे. मात्र ही सर्वच शेतकरी कुटुंबे आहेत. त्यांची शेती आणि दुग्धव्यवसाय हीच दोन उपजीविकेची साधने आहेत. नुकतीच भातरोप लागणीची लगबग सुरू असतानाच महापुराच्या संकटाने रोपेच वाहून गेली. वर्षभर उदरनिर्वाह कशावर करायचा या विवंचनेत असतानाच अचानक डोंगर व जमिनी सरकून, डोंगरही कोसळून नवीन संकटाची भर पडली तर गावालगतच्या डोंगरावर असलेला विजेचा मनोरा कोसळला होता तो कोणत्याही क्षणी गावाकडे सरकेल, अशी भीती होती त्याबाबत बातम्या प्रसिद्ध होताच त्याची पुन्हा उभारणी केली; मात्र धोका अजून संपलेला नाही.
फोटो ओळीः
जिंतीजवळील जितकरवाडीतील डोंगराची माती, दगडगोटे ढासळत असल्याने विद्युत मनोरा कलला होता. त्याचे काम सुरू केले आहे.