दरानं केला घात.. ट्रॅक्टरनं शिवार साफ

By admin | Published: November 1, 2016 11:57 PM2016-11-01T23:57:17+5:302016-11-01T23:57:17+5:30

झेंडू उत्पादक शेतकरी हतबल : भगव्या सोन्याला कवडीमोल दराने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

The track is clean. Tractor shaw cleaner | दरानं केला घात.. ट्रॅक्टरनं शिवार साफ

दरानं केला घात.. ट्रॅक्टरनं शिवार साफ

Next

 
किडगाव : ‘चांगला दर मिळेल या आशेवर अख्ख्या शिवारांत झेंडू लावला. तळहाताच्या फोडाप्रमाणे त्याची जपणूक केली. दिवाळी गोड होईल या आशेवर झेंडूची बाजारपेठेत विक्री करण्याचे ठरवले. मात्र, घडलं भलतंच. फुलांचे दर अगदी दोन-तीन रुपयांवर आले आणि आनंदावर विरजन पडले. अखेर पाणावलेल्या डोळ्यांनी अख्ख्या शिवारात ट्रॅक्टर फिरवून झेंडू जमीनदोस्त
करावा लागला,’ हे बोल आहेत किडगाव येथील शेतकरी उमेश शिंदे यांचे.
दसरा व दिवाळीत झेंडूला मोठी मागणी असते. दसऱ्याला झेंडूच्या फुलांना चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांना थोडे हायसे वाटले. दिवाळीतही दर असाच राहील या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी शिवारात झेंडू तसाच ठेवला. मात्र, शेतकऱ्यांची दिवाळीत साफ निराशा झाली. दराअभावी शेतकऱ्यांना झेंडूची फुले फुकट देण्याची अथवा टाकून देण्याची वेळ आली. याबाबत शेतकरी उमेश शिंदे ‘लोकमत’शी बोलताना
म्हणाले, ‘मोठ्या जिद्दीनं अन् कष्टानं झेंडूच्या फुलांचे शेत फुलविले.
तीन महिन्यांपूर्वी पाऊण एकरावर झेंडूची लागवड केली. रोपे, औषध फवारणी, खते यासाठी सुमारे
३५ ते ४० हजार रुपये इतका खर्च आला.
दिवाळीच्या तोंडावरच शेताच पिवळा शालू पांघरला. या सणात फुलांना मोठी मागणी असल्याने फुले विक्रीसाठी तोडली. मात्र, बाजारभावानुसार फुलांना किलोमागे अवघा दोन ते तीन रुपये दर मिळाला. दराने धोका दिल्याने पदरी निराशाच पडली. त्यामुळे पाऊण एकर क्षेत्रावरील झेंडू रोटरने जमीनदोस्त करावा लागला. झेंडूसाठी केलेला सर्व खर्च वाया गेला. नफा तर सोडाच नुकसानच अधिक सोसावे लागले. किडगावसह परिसरातील अनेक शेतकऱ्यांवर हे संकट ओढावले आहे. (वार्ताहर)
वडूजच्या मतदारांना घरपोच ‘दिवाळी गिफ्ट’
निवडणुकीचा हंगाम : ऐन दिवाळीत निघणार संभाव्य विकासकामांचे दिवाळ
वडूज : लोकशाहीमधील ‘मतदार राजा’ हा निवडणुकी पुरताच केंद्रबिंदू असतो. याची प्रचिती वडूज नगरपंचायत निवडणुकी दरम्यान असल्याचे सदृश्य चित्र दिसून येत आहे. वडूज शहराची नगरपंचायत असली तरी राज्याला हीच नगरी हुतात्म्यांची भूमी म्हणूनच परिचित आहे. सध्या या नगरीत निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने मतदार खूश करण्यासाठी वेगवेगळे प्रकार अंमलात येत आहेत. यातील एक भाग म्हणून ऐन दिवाळीत ठराविक उमेदवारांकडून मतदारांना कपडे यासह मिठाईचे बॉक्स घरपोच होत आहेत. अशा प्रलोभनामुळे भविष्यातील विकासकामांचे दिवाळं निघते की काय? अशी भीती सुज्ञ मतदारांकडून व्यक्त होत आहे.
सन २०१२ च्या जनगणनेनुसार वडूज शहराची लोकसंख्या १७ हजार ६३६ असून, कुटुंब संख्या ३ हजार २०० इतकी आहे. तर नगरपंचायत निवडणुकीत १४ हजार १६१ इतके मतदार मतदान करणार आहेत. लोकशाहीतील निवडणुकीला अशा प्रलोभनामुळे विकासकामांना खीळ बसेल, अशी सुप्त भीतीही जाणकारांमधून जाणवते. हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये, यासाठी सर्वच स्तरांवर आजअखेर मतदारांकडून प्रयत्न केले जात आहेत.
या निवडणुकीत विक्री अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक तुल्यबळ होणार असेच चित्र असून, नगरीचा विकासात्मक अजेंडा कोण राबवितो याकडे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीदरम्यान जाहीरनामे आणि वचननामे निघतीलच याकडे जागृत मतदारांचे लक्ष केंद्रित करणे याकडे उमेदवारांचा कल जादा राहणार आहे. परंतु मतदारांना वेगवेगळ्या प्रलोभनामुळे आकर्षित करण्याचे प्रकार काही उमेदवारांना ‘बुमरँग’ ही ठरू शकते. ऐन दिवाळीत काही उमेदवारांकडून मतदारांना दाखविली जाणारी आमिषे संभाव्य निवडणुकीला तडा जाणारी असली तरी या बाबीकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष का? असा प्रश्न ही पुढे येत आहे.
यावर काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियाद्वारे प्रबोधन ही केले जात आहे. ही लोकशाहीच्या बाबत जमेची बाजू आहे. कोणत्याही निवडणुकी दरम्यान वडूज शहराचे वातावरण हे खेळीमेळीचे असते हा इतिहास संपूर्ण तालुक्याला ज्ञात आहे. मात्र, निवडणुकीपूर्वीच वडूज नगरीत ‘बाहेरवासा’ झाल्याने अशी प्रलोभने मतदारांना वाकुल्या दाखवित आहेत. उमेदवार मुलाखतीवेळी उमेदवाराला...‘किती खर्च करू शकता’ असे प्रश्न विचारले जात होते, त्यावरच त्याची उमेदवारी ठरत होती.
मतांची पेरणी करण्यासाठी काही प्रभागांमध्ये संभाव्य इच्छुक उमेदवारांकडून ठराविक मतदारांना जीन्स पँट, नेहरू-झब्बा आणि प्रसिद्ध मिठाईचे वाटप झाले. सरासरी प्रत्येक प्रभागात सुमारे अडीचशे कुटुंब संख्या आहे. मिठाईची किंमत सरासरी शंभर रुपये असून, कपडे ही प्रत्येकी दीड हजार रुपयांच्या आसपास खरेदी झाल्याने उमेदवारांचे दिवाळ तर मतदारांची दिवाळी साजरी होताना दिसून येत आहे. या अशा आर्थिकदृष्ट्या तगड्या उमेदवारांना शह देण्यासाठी सामाजिक भान असणाऱ्या उमेदवारांनी ही सोशल मीडियाचा वापर सुरू केला आहे. मतदारांनीही क्षणभंगूर विचार करून अशा प्रलोभनाला बळी पडू नये. यामुळे संभाव्य विकासाला खीळ बसू शकते, अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावरून फिरताना आढळून येत आहेत. तर ‘एक दिवस पँट फाटल ...मिठाईपण संपेल; पण उर्वरित दिवसांच काय?, ‘ एक नोट ...विकासाची खोट,’ ‘५ वर्षे गुणिले ३६५ बरोबर १८२५ दिवस भागीले मिळालेली नोट !...मग सांगा आपण ऐवढे स्वस्त आहोत काय? ’ असे मेसेज ही सोशल मीडियावरून फिरत असल्यामुळे गंमतदार जनजागृती होत आहे. पहिलीच नगरपंचायत निवडणूक पारदर्शक होण्यासाठी सर्वच स्तरांतून प्रयत्न होणे काळाची गरज असल्याच्या चर्चेला उधाण येत आहे. (प्रतिनिधी)
पुसेगावकरांच्या शपथेची अजूनही चर्चा !
काहीच दिवसांपूर्वी पुसेगावमध्ये सेवागिरी देवस्थान ट्रस्ट निवडणूक शांततेत पार पडली. ही निवडणूक तिरंगी होऊन अटीतटीची झाली. या निवडणुकी दरम्यान पुसेगावचे उपसरपंच रणधीर जाधव यांनी सर्वच पॅनेल प्रमुखांपुढे एक प्रस्ताव मांडला की, ही निवडणूक सेवागिरी देवस्थानची असल्याने या निवडणुकी दरम्यान मतदारांना कोणतेही प्रलोभने न दाखविण्यासाठी मंदिरातील समधीस्थळावर सर्वच उमेदवारांनी शपथ घेऊयात. या त्यांच्या प्रस्तावाला सर्वांनी एकमताने होकार दिल्याने ही सेवागिरी देवस्थान ट्रस्ट निवडणूक प्रशासनाच्या आचारसंहितेला साजेशी झाली.
 

Web Title: The track is clean. Tractor shaw cleaner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.