खंडोबाच्या रथाला जोडणार ट्रॅक्टर

By Admin | Published: January 19, 2016 10:47 PM2016-01-19T22:47:49+5:302016-01-19T23:46:19+5:30

पाल यात्रेस उद्यापासून प्रारंभ : मिरवणूक मार्ग, गर्दीच्या ठिकाणांवर सीसीटीव्ही; पोलीस प्रमुखांकडून यात्रास्थळाची पाहणी

Tractor connecting Khandoba's chariot | खंडोबाच्या रथाला जोडणार ट्रॅक्टर

खंडोबाच्या रथाला जोडणार ट्रॅक्टर

googlenewsNext

काशीळ : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील श्री खंडोबा देवाची यात्रा गुरुवार, दि. २१ पासून सुरू होत आहे. यंदा खंडोबा देवाची मिरवणूक हत्ती ऐवजी चांदीच्या रथातून निघणार असून हा रथ ओढण्यासाठी ट्रॅक्टरचा उपयोग केला जाणार आहे. यासाठी हा रथही मागविण्यात आला आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व यात्रा कमिटीची सर्व कामे पूर्ण झाली असून, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी यात्रास्थळाची पाहणी केली.
दि. २१ ते २५ जानेवारी या कालावधीत श्री खंडोबा देवाची यात्रा होणार असून, यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रा कालावधीत कुठेही अनुचित प्रकार घडू नये, या करिता उंब्रज पोलीस ठाण्याचे पथक यात्रा स्थळावर तळ ठोकून आहे. यात्रेत मुख्य ठिकाणी तसेच मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही तसेच टॉवर्स बसविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून, मिरवणूक मार्गातील अडथळे दूर करण्याचे काम यात्रा कमिटी, देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू आहे. दरम्यान, यात्रा कमिटीच्या वतीने यात्रेत सहभागी होणाऱ्या मानकऱ्यांना आणि भाविकांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात येत आहे.
परिवहन विभागाच्या वतीने यात्रेकरिता येणाऱ्या भाविकांना कोणताही अडथळा येऊ नये, याकरिता पाल येथे शेड उभारण्याचे काम सुरू आहे. माहिती फलक तयार केले जात आहेत .
यात्रेत सहभागी होणाऱ्या व्यावसायिकांना ग्रामपंचायत व यात्रा कमिटीच्या वतीने परवाने देण्यात येत आहेत. यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनासह देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी, ग्रामपंचायत, विविध मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते, खंडोबा देवाचे मानकरी परिश्रम घेत आहेत. यात्रेच्या पार्श्वभूमीवर पाल येथे होटेल्स, मिठाईची दुकाने, मोठ-मोठे पाळणे, खेळण्यांची दुकाने चप्पल स्टॉल्स, बांगडी स्टॉल्स, सिनेमा टॉकीज अशी अनेक दुकाने थाटण्यात आली आहेत.
दरम्यान, यात्रेत अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी राजलक्ष्मी शिवणकर, उंब्रजचे सहायक पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी मिरवणूक मार्गासह मंदिर परिसराची पाहणी करत आवश्यक त्या ठिकाणी बदल करण्याच्या सूचना डॉ. देशमुख यांनी उपस्थित अधिकारी व ग्रामस्थांना केल्या. (वार्ताहर)


वाहतुकीत बदल
यात्रेत वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल केले आहेत. यात्रा कालावधीत काशीळ ते पाल रोडने येणारी सर्व वाहने आदर्शनगर गावाजवळील बसस्थानकरासमोरील वाहनतळ, हरपळवाडी ते पाल या मार्गाने येणारी सर्व वाहने ही इमर्सन कंपनीजवळील वाहनतळावर थांबविण्यात येणार यावी. वडगाव ते पाल हा सर्व मार्ग आपत्कालीन असून, या मार्गावर वाहतुकीस बंदी आहे.

Web Title: Tractor connecting Khandoba's chariot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.