महाबळेश्वरमध्ये बाजारपेठेत जाणाऱ्या वाहनांना ब्रेक; व्यापारी, पर्यटकांमध्ये समाधान
By दीपक शिंदे | Published: November 24, 2023 05:57 PM2023-11-24T17:57:04+5:302023-11-24T17:57:23+5:30
उपाययोजनांमुळे वाहतुकीला लागली शिस्त
महाबळेश्वर : महाबळेश्वर बाजारपेठेतील वाहतुकीला कोणी शिस्त लावयची, याबाबत पालिका आणि पोलिस प्रशासन यांच्यात वाद होता; परंतु आंदोलनामुळे जबाबदारी कोणाची, या प्रश्नाचा निकाल लागला असून या दोन्ही विभागांनी समन्वय साधून केलेल्या उपाययोजनांमुळे बाजारपेठेतील वाहतुकीला शिस्त लागली आहे. बाजारपेठ वाहनमुक्त झाल्याने व्यापारी व पर्यटकांतून समाधान व्यक्त होत आहे.
वाहतूक शिस्तीला दृष्ट लावण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. बॅरिकेट्समुळे ज्या व्यापाऱ्यांची वाहने बाजारपेठेत येऊ शकत नाही, अशा काही मंडळींनी बाजारातील वाजती घंटा हाताशी धरून वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी लावण्यात आलेल्या बॅरिकेट्सबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. तसेच या बॅरिकेट्सचा पर्यटकांना त्रास होत होता. बाजारात येण्यासाठी मंदिराच्या दर्शन रांगेप्रमाणे रांगा लागत होत्या. बाजारातून पुन्हा बेशिस्त वाहतूक सुरू करणाऱ्यांना मोकळे सोडायचे का? बॅरिकेट्सऐवजी पोलिस बंदोबस्त लावा, असाही उपाय सुचविण्यात आला होता.
परंतू, पोलिस कर्मचारीच उपलब्ध नसल्याने बाजारपेठेतून वाहतुक सुरू झाली. बाजारपेठेतील वाहतुकीबाबत जी मंडळी अपप्रचार करून अतिक्रमण वाढल्याचे सांगत आहेत, ती मंडळी वाहतूक आणि अतिक्रमण या दोन्ही समस्यांची गल्लत करीत आहेत. अतिक्रमणासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना केलीच पाहिजे; परंतु बॅरिकेट्समुळे अतिक्रमण वाढल्याचा जावई शोध लावू नये, अशा प्रतिक्रियाही काही व्यापाऱ्यांमधून उमटल्या. मात्र हा प्रश्न अखेर निकाल लागला असून या दोन्ही विभागांनी समन्वय साधून केलेल्या उपाययोजनांमुळे बाजारपेठेतील वाहतुकीला शिस्त लागली आहे.