दुकाने सुरू करण्याची व्यापाऱ्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:38 AM2021-04-10T04:38:14+5:302021-04-10T04:38:14+5:30
रामापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यासाठी ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता ...
रामापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यासाठी ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या मिनी लॉकडाऊनला पाटण शहरातील दुकानदारांसह व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवत दुकाने चालू करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भाेसले व तहसीलदार योगेश्वर टोंपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पाटण शहरातील सर्व व्यापारी, दुकानदारांनी लॉकडाऊनला विरोध दर्शविला आहे. मागील वर्षी वर्षभर दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांची दुकाने भाड्याने असल्याने भाड्यासह कर्मचाऱ्यांचा पगार, वीजबिल, तसेच अन्य खर्च भागवणे अडचणीचे झाले आहे. यंदाही लॉकडाऊन जाहीर केल्याने छोट्या-मोठ्या दुकानदारांचे जगणे अवघड होणार आहे. व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. सर्व व्यापारी व दुकानदारांचा वीकेंडच्या लॉकडाऊनला पूर्णपणे पाठिंबा आहे. मात्र, मिनी लॉकडाऊनला विरोध असून, निर्बंध शिथिल करून दुकाने काही काळ उघडी ठेवण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी पाटणसह परिसरातील व्यापारी, दुकानदारांनी उदयनराजे व तहसीलदार योगेश्वर टोंपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबतचे निवेदन तहसीलदार योगेश्वर टोंपे, सपोनि नितीन चौखंडे, पाटण नगरपंचायत यांनाही देण्यात आले आहे. निवेदनावर मंगेश खटावकर, अकबर मुकादम, नदीम मोकाशी, कमलेश खैरमोडे, हणमंत मोकाशी, कृष्णत पवार, बाबुराव गुरव, सम्राट घेवारी, गोविंद पुरोहित, संतोष खुंटाळे, तोसिक हकीम, कृष्णत जाधव, रूपेश माने, विजय महादर, नरेंद्र खांडके, अय्याज मुजावर, कमलेश पवार, दीपक मांडावकर, दीपक साळुंखे, बाजीराव मोरे यांच्यासह शहरातील दुकानदार, व्यापारी यांच्या सह्या आहेत.