शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Published: February 2, 2015 09:34 PM2015-02-02T21:34:44+5:302015-02-02T23:59:29+5:30
स्थानिक शेतकऱ्यांना विकण्यासाठी आठवडी बाजारातून दिवसभर थांबावे लागत होते.
खंडाळा : खंडाळा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने खंडाळा येथील उपबाजार मैदानावर शेतकऱ्यांसाठी फळ-भाजीपाला विक्रीचे आठवडी बाजार आयोजित करण्यात आला होता. यामध्ये स्थानिक शेतकऱ्यांनी तब्बल १२० पिकअप गाड्यांमधून आणलेला शेतीमाल विकला गेला. सुमारे ८० टन वजनाच्या फळभाज्यांची विक्री झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
खंडाळा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांच्या संकल्पनेतून हा बाजार भरविण्यात आला. स्थानिक शेतकऱ्यांना विकण्यासाठी आठवडी बाजारातून दिवसभर थांबावे लागत होते. मात्र, बाजार समितीच्या माध्यमातून शेतीमाल विकण्याची संधी प्राप्त झाली. एकाचवेळी एकाच ठिकाणी रोख रक्कमेने माल निवडला गेल्याने शेतकऱ्यांची वेळेची बचत झाली.याशिवाय आठवडी बाजारातील सर्व व्यापाऱ्यांना एक ठिकाणी विविध प्रकारचा वाण पाहायला मिळाला. त्यामुळे निवडक माल खरेदी करण्यास मिळाली. खंडाळ्यात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या बाजाराचे नियोजन केले गेले होते. याबाजारात मोठ्या प्रमाणात फळभाज्यांची विक्री झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळाला. या बाजारास शेतकरी व व्यापारी यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)