‘ट्रॅडिशनल डे’ला हुल्लडबाजांवर संक्रांत!
By admin | Published: January 15, 2017 12:56 AM2017-01-15T00:56:57+5:302017-01-15T00:56:57+5:30
कऱ्हाडात पोलिसांची कारवाई : ऐटीतल्या टिकोजीरावांना काठीचा प्रसाद; ओळखपत्र नसणाऱ्यांना महाविद्यालयातून हुसकावले
कऱ्हाड : मकरसंक्रांतीचा दिवस महाविद्यालयांमध्ये पारंपरिक वेशभूषा दिन म्हणून साजरा केला जातो. शनिवारीही कऱ्हाडला ‘ट्रॅडिशनल डे’ साजरा झाला. युवक-युवती नटून-थटून कॉलेज कॅम्पसमध्ये वावरले. मात्र, ज्यांचा कॉलेजशी सूतराम संबंध नाही, असे युवकही कॅम्पस परिसरात वावरत होते. अखेर पोलिसांनी दंडुका उगारल्यानंतर या टिकोजीरावांना पळता भुई थोडी झाली. पोलिसांच्या कारवाईमुळे संबंधितांवर अक्षरश: संक्रांतच ओढावली.
कऱ्हाडनजीकच्या विद्यानगरमध्ये विविध शाखांचे शिक्षण देणारी महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या वर्षात हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. येथील महाविद्यालय परिसर नेहमीच गजबजलेला असतो. मात्र, परिसरातील वाढत्या छेडछाडीच्या घटना लक्षात घेऊन महाविद्यालय व्यवस्थापनानेही सुरक्षेच्या दृष्टीने कडक पावले उचलली आहेत. बहुतांश महाविद्यालयांमध्ये सध्या ओळखपत्र असल्याशिवाय विद्यार्थ्याला प्रवेश दिला जात नाही. तसेच महाविद्यालयातून बाहेर पडेपर्यंत विद्यार्थी-विद्यार्थिनींना ते ओळखपत्र गळ्यातून काढता येत नाही. कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी ‘ड्रेस कोड’ ही तयार केला आहे. याचबरोबर महाविद्यालय परिसरात ठिकठिकाणी पोलिस ठाणे, महाविद्यालयांचे प्राचार्य, सुरक्षा समिती आदींचे नंबरही लावण्यात आले आहेत. छेडछाड किंवा हुल्लडबाजीचा प्रकार घडताच याबाबतची माहिती पोलिस किंवा प्राचार्यांना मिळावी, हा त्यामागचा उद्देश आहे.
महाविद्यालय व्यवस्थापनासोबत कऱ्हाड शहर पोलिसांकडूनही या परिसरावर विशेष लक्ष ठेवण्यात येते. शहर पोलिस ठाण्याचे निर्भया पथक या परिसरात वारंवार गस्त घालत असते. महाविद्यालय परिसरात अनेक युवक निव्वळ हुल्लडबाजी करण्याच्या उद्देशाने येत असतात. तसेच यावेळी विद्यार्थिनींची छेड काढण्याचा किंवा त्यांच्यावर शेरेबाजी करण्याचा प्रकारही घडतो. त्यामुळे अशा प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलिसही याठिकाणी फिरत असतात.
शनिवारी पारंपरिक वेशभूषा दिन असल्याने या परिसरावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले होते. ‘ट्रॅडिशनल डे’च्या निमित्ताने अनुचित प्रकार घडू नये, अथवा विद्यार्थिनींची छेडछाड होऊ नये, यासाठी गुन्हे प्रकटीकरण व वाहतूक शाखेचे पथक विद्यानगरमध्ये सकाळपासून तळ ठोकून होते. रस्त्याकडेला विनाकारण घुटमळणाऱ्यांना हटकण्याबरोबरच वारंवार फेरफटका मारणाऱ्या युवकांना जाब विचारून त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम पोलिसांनी सुरू केली.
अचानक सुरू झालेल्या या तपासणीने हुल्लडबाज युवकांनी तेथून काढता पाय घेतला. मात्र, काही युवकांना पोलिसांच्या काठीचा प्रसाद घ्यावा लागला. (प्रतिनिधी)
युवकांची तिळगूळ वाटपाची हुशारी
पोलिसांनी ‘प्रसाद’ द्यायला सुरुवात करताच हुल्लडबाज युवक गडबडले. काहींनी पोलिसांपासून वाचण्यासाठी एकमेकांना तिळगूळ वाटण्याचा कार्यक्रम सुरू केला. मात्र, संबंधितांची ही हुशारी पोलिसांच्या नजरेतून सुटली नाही. पोलिसांनी काठी उगारताच संबंधित युवकांची धावाधाव सुरू झाली. वाट मिळेल त्या दिशेने युवक धावताना दिसत होते.
फोटो पेपरात छापणार का?
हुल्लडबाज युवकांवर सुरू असलेली ही कारवाई प्रसिद्धी माध्यमांचे छायाचित्रकार कॅमेराबद्ध करीत होते. त्यावेळी पोलिसांचा ससेमिरा चुकवत आडोशाला गेलेल्या युवकांनी काही वेळांनंतर छायाचित्रकारांना गाठले. हे फोटो पेपरात छापणार का? अशी विचारणा त्यांनी केली. तसेच माझा फोटो तेवढा छापू नका, अशी गळही काहीजणांनी घातली.
महाविद्यालय परिसरात साध्या वेशातील पोलिसांची नेहमीच गस्त असते. शनिवारी पारंपरिक वेशभूषा दिन होता. या दिवशी हुल्लडबाजीच्या काही घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यातून मारामारीसारखे काही गंभीर गुन्हेही घडले आहेत. त्यामुळे शनिवारी गुन्हे शाखेचे एक पथक सकाळपासून त्याठिकाणी तैनात करण्यात आले होते.
- संतोष चौधरी, सहायक पोलिस निरीक्षक
गुन्हे प्रकटीकरण शाखा, कऱ्हाड शहर
‘ट्रॅडिशनल डे’ला महाविद्यालयीन युवक-युवतींच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. या दिवसाच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न होतो. तसेच आपसातील कटुताही याचदिवशी कमी होते. मात्र, काहीजण या दिवसाचा गैरअर्थ घेऊन हुल्लडबाजी करतात. शनिवारी पोलिसांनी केलेली कारवाई स्वागतार्ह आहे.
- काजल पाटील, विद्यार्थिनी, कऱ्हाड