मोबाइलच्या दुनियेत पारंपरिक खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:46 AM2021-02-17T04:46:32+5:302021-02-17T04:46:32+5:30
कुडाळ : आधुनिकतेचे पांघरुण घेतलेल्या आजच्या पिढीला मोबाइलच्या दुनियेतून बाहेर पडायलाच वेळ नाही. याचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर ...
कुडाळ : आधुनिकतेचे पांघरुण घेतलेल्या आजच्या पिढीला मोबाइलच्या दुनियेतून बाहेर पडायलाच वेळ नाही. याचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. यातच सुरपट्या, लगोरी, भोवरा, सुरपारंब्या, विटी दांडू, काट्याकोल्या, आट्या-पाट्या, गोट्या, सागरगोट्या, कांदाफोडी, बदाम सात, गलोल, भातुकली, असे कितीतरी पारंपरिक खेळ पूर्वी खेळले जायचे. आजच्या पिढीला याचा पुरता विसर पडला आहे.
आज अगदी चार-सहा महिन्यांच्या बालकालाही मोबाइलचे आकर्षण वाटत आहे. आधुनिकतेच्या विचारात आपण स्वतःकडेच लक्ष द्यायला विसरत आहोत. ज्या पारंपरिक खेळांतून आनंद, ईर्षा, चढाओढ, जिंकण्याची मनीषा निर्माण होत होती. याचाच आपल्याला विसर पडलाय. या प्रत्येक खेळाचे वगळे वैशिष्ट्य दडलेले आहे. आपल्या मातीशी, संस्कृतीशी त्याचा धागा जोडलेला आहे. ज्या भागात हे खेळ खेळले जायचे त्या ठिकाणचा समाज, परिसराचा इतिहास यातून आपल्याला पाहता येत होता. यातून वेगवेगळ्या गावची संस्कृती, रूढी-परंपरांचे दर्शन घडायचे. महाराष्ट्रात असे अनेक खेळ गावागावात आजही प्रचलित आहेत.
आज आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे हे सर्वच खेळ आपण विसरलो आहोत. कोणताही खर्च न होता अगदी कमी साहित्यात या खेळांमधून उत्तम व्यायाम होत होता. यातून आपल्या उपजत कलाकौशल्यांचा विकास घडण्यास मदत होत होती. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखले जात होते; परंतु सध्याच्या मोबाइल आणि संगणकाच्या युगात आपण यापासून दुरावत आहोत. एकमेकांशी होणारा संवाद कमी होत आहे. यामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला धोका पोहोचत आहे.
(कोट...)
पारंपरिक खेळांमुळे मुलांचे मानसिक आणि भावनिक आरोग्यही चांगले राहते. यातून शारीरिक मेहनतीबरोबरच करमणूक आणि आनंद प्राप्त होतो. परस्परांशी संवाद साधला जाऊन मन प्रसन्न होते. बदलत्या काळात आपण आपले पारंपरिक खेळही विसरत आहोत. आपली संस्कृती, परंपरा यातून प्रतीत होत असते यांची जपणूक होणे आवश्यक आहे. नवीन पिढीला पारंपरिक खेळांची माहिती होऊन हे खेळ शिकवायला हवेत.
-रामदास गोळे, राष्ट्रीय पंच कबड्डी