वाहतूक अस्ताव्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:18 AM2021-05-04T04:18:22+5:302021-05-04T04:18:22+5:30
फलटण : येथील शहर व परिसरातून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व रस्ता पार करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने वाहतुकीचा बोजवारा ...
फलटण : येथील शहर व परिसरातून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व रस्ता पार करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. या मार्गावर सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामुळे वाहनचालकांची डोकेदुखी ठरत आहे. वाहतूक पोलिसांनी तातडीने लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
००००००
मास्कचा वापर वाढला
सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दररोज हजारांच्या पटीत वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनीही चांगलीच धास्ती घेतली आहे. कोरोनाचा धोका वाढत आहे. लॉकडाऊन असला तरी काही अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडणारे लोक मास्कचा वापर आवर्जून करत आहेत.
००००००००
तरुणांची बेपर्वाई
सातारा : साताऱ्यातील अनेक तरुण रात्री मित्रांसोबत एकत्र येतात. तेथे गप्पा मारताना कोणाच्याही गाड्यांच्या हॅण्डलवर मास्क काही वेळासाठी काढून ठेवतात अन् तसाच विसरून जातात. हा प्रकार त्यांच्यासोबतच इतरांसाठी धोक्याचा ठरतो. त्यामुळे संबंधितांवर कारवाईची गरज आहे.
००००००
रस्ता टकाटक
सातारा : साताऱ्यातील अनेक गावांना जोडणारे रस्ते खराब झाल्याच्या, खड्डे पडल्याच्या तक्रारी येत असतात. मात्र सातारा-धावडशी रस्ता अतिशय टकाटक आहे. धावडशीहून काही मिनिटांत नागरिक साताऱ्यात येत आहेत. या रस्त्याची निगा राखण्याची मागणी केली जात आहे.
००००००
आंब्यांची आवक वाढली
कोरेगाव : सध्या शहरातील बाजारपेठेत ठिकठिकाणी आंब्याची विक्री केली जात आहे. सध्या आंबे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने चारशे ते सहाशे रुपये डझन दराने विकली जात आहेत. त्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
०००००००
टोप्या मिळेनात
सातारा : जिल्ह्यात उन्हाचे चटके चांगलेच बसत आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने भलेही लॉकडाऊन जाहीर केले असले तरी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना घरातून बाहेर पडावेच लागत आहे. मात्र, बाजारात टोप्या कोठेही मिळत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.
०००००००
दारावर भाजीविक्री
सातारा : कोरोनानंतर संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे नियोजन करून सातारकरांना दारावर भाजी, फळे मिळतील असे नियोजन केले होते. त्यानंतर काही विक्रेत्यांना दारावर जाऊन भाजी विक्री करण्याची सवय लागली आहे, ती कायमच आहे. ते आजही दररोज वेगवेगळ्या भागात जाऊन फळे, भाजी हातगाडीवरून नेऊन विक्री करत असतात. त्यामुळे सातारकरांची चांगली सोयही होत आहे.
००००००००
पावसानंतर सापांचे दर्शन
सातारा : सातारा शहर परिसरात रविवारी सायंकाळी खूपच मोठा पाऊस झाला होता. पावसाचे पाणी ओढ्यांमधील छिद्रांमध्ये गेल्यामुळे सोमवारी मोठ्या प्रमाणावर साप बिळातून बाहेर पडले होते. त्यांचा वावर वाढल्याने ओढ्यालगतच्या घरांमध्ये राहणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
००००००
बाबासाहेब आंबेडकरांमुळे कामगार शोषणमुक्त : खंडाईत
सातारा : ‘कामगार चळवळीला स्वातंत्र्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांच्या प्रश्नावर आवाज उठवत कामगारमंत्री पदावर असताना अनेक कामगारांच्या प्रश्नांना कायद्याचे स्वरूप दिले. त्यामुळे शोषणमुक्त कामगार आज आत्मसन्मानाने काम करत आहे,’ असे मत महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी व्यक्त केले. कामगारदिनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विविध चळवळीतील, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.