ढेबेवाडी फाटा चौकात वाहतुकीचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:09 AM2021-07-13T04:09:24+5:302021-07-13T04:09:24+5:30
मलकापूर : ढेबेवाडी फाटा येथे वाहनचालक अस्ताव्यस्तपणे रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असून, वाहतुकीचा बोजवारा उडत ...
मलकापूर : ढेबेवाडी फाटा येथे वाहनचालक अस्ताव्यस्तपणे रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असून, वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. ढेबेवाडी फाटा हे परिसरातील मध्यवर्ती केंद्र आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. तसेच वडाप वाहनेही याचठिकाणी थांबतात. त्यामुळे कोंडीत भर पडते. पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
तांबवे फाट्यापासून रस्त्याची अवस्था दयनीय
तांबवे : तांबवे फाटा ते तांबवेपर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, रस्ता धोकादायक बनला आहे. तांबवे येथे नवीन पूल सुरू करण्यात आला आहे. मात्र, या मार्गावर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यातील खड्ड्यांवर संबंधित विभागाने तात्पुरती मलमपट्टी केली आहे. सध्या खडी उखडून पूर्वीपेक्षा मोठे खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
कऱ्हाडात सिग्नलजवळील रिक्षा थांबे हटवा
कऱ्हाड : शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, त्याठिकाणी असलेल्या रिक्षा थांब्यामुळे सध्या वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. बसस्थानक परिसरात सिग्नल यंत्रणेलगतच हे रिक्षा थांबे असल्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. याठिकाणी निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय म्हणून पोलीस प्रशासन व पालिका प्रशासनाने संयुक्तिक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.