थंड महाबळेश्वरात मार्ग काढताना पर्यटकांना फूटतोय घाम..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 04:09 PM2021-12-13T16:09:38+5:302021-12-13T16:10:20+5:30
महाबळेश्वरात पर्यटकांचा हिवाळी हंगाम सुरू झाला असून, हजारो पर्यटक व सौंदर्यनगरीला भेट देत आहेत. मात्र, वाहतूक व्यवस्थेचा सातत्याने बोजवारा उडत असल्याने आनंदोत्सव साजरा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा अक्षरश: हिरमोड होत आहे.
अजित जाधव
महाबळेश्वर : महाबळेश्वरात पर्यटकांचा हिवाळी हंगाम सुरू झाला असून, हजारो पर्यटक व सौंदर्यनगरीला भेट देत आहेत. मात्र, वाहतूक व्यवस्थेचा सातत्याने बोजवारा उडत असल्याने आनंदोत्सव साजरा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा अक्षरश: हिरमोड होत आहे. प्रामुख्याने शनिवार व रविवारी येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, येथील वाहतूक व्यवस्थेबाबत आता पोलीस अधीक्षकांनीच शिस्त लावावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
महाबळेश्वर हे जागतिक पर्यटन स्थळ असल्यामुळे देश-विदेशातून पर्यटक महाबळेश्वरला पर्यटनास येत असतात. नुकताच पर्यटकांचा हिवाळी हंगाम सुरू झाला असून, नववर्षाच्या स्वागतासाठीदेखील महाबळेश्वर सज्ज झाले आहे. त्यामुळे आतापासून येथे पर्यटकांची रेलचेल सुरू झाली आहे. मात्र, महाबळेश्वरचे प्रवेशद्वार असलेल्या वेण्णा तलावासह ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत असून, पर्यटकांचा अक्षरश: कोंडमारा होत आहे.
या समस्येबाबत उपाययोजना करण्यासाठी महाबळेश्वर पोलीस प्रशासनाकडूनही ठोस पावले उचलली जात नाहीत. सध्या महाबळेश्वर पोलीस ठाण्यात ३७ कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी तीन ते चार कर्मचारीच वाहतूक नियमनाचे काम करताना दिसतात. हजारो पर्यटक व वाहनांची मदार केवळ चार कर्मचाऱ्यांवर असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांकडून वाहतूक व्यवस्थेबाबत कोणतेही नियोजन केले जात नसल्याने थंड हवा खाण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना अक्षरश: घाम फुटत आहे.
पोलीस केवळ मोक्याच्या ठिकाणी
वाहतूक शाखेचे सातपैकी केवळ दोन कर्मचारी दिवसभर महाड नाक्यावर कार्यरत असतात. जिथे वाहतूक कोंडी क्वचितप्रसंगी होते. दोन कर्मचारी क्षेत्र महाबळेश्वर मार्गावरील नाक्यावर असतात. इथेही म्हणावी अशी कोंडी होत नाही. हे चारही कर्मचारी सायंकाळी पुन्हा पंचायत समितीजवळ येतात. जिथे खरी गरज आहे तिथेच कर्मचारी नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
- वेण्णालेक परिसरात वाहतूक कोंडी झाल्यास शहरातून कर्मचारी तेथे पाठविले जातात. तोवर बाजारपेठेत वाहतूक कोंडी होते.
- अनावश्यक ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते.
- वाहतूक व्यवस्थेबाबत कोणतेही नियोजन केले जात नाही. त्यामुळे शनिवार व रविवारी महाबळेश्वरचा श्वास गुदमरतो.