विडणी जवळील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 10:23 AM2019-09-25T10:23:22+5:302019-09-25T10:25:10+5:30
आळंदी- पंढरपूर पालखी मार्गावर फलटण तालुक्यातील विडणी येथील ओढ्याला पूर आला. पुलावरून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने वाहतूक बंद झाली आहे. परिणामी वाहनांच्या चार किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत.
वाठार निंबाळकर : पावसाळा संपत आला तरी फलटण तालुक्यात दमदार पाऊस पडला नव्हता. मात्र सोमवारी रात्री व मंगळवारी रात्री जोरदार पाऊस पडल्याने बुधवारी पहाटे तीन वाजलेपासून आळंदी- पंढरपूर पालखी मार्गावर फलटण तालुक्यातील विडणी येथील ओढ्याला पूर आला.
पुलावरून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने वाहतूक बंद झाली आहे. परिणामी वाहनांच्या चार किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. बुधवारी सकाळी या रस्त्यावरुन भाजी विक्री साठी, शाळा-महाविद्यालय साठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना परत घरी जावे लागले.
एसटी बस व इतर वाहनातील अनेक प्रवाशी अडकून पडले आहेत. भाडंळी येथील ओढ्याला आलेल्या पुरामुळे फलटण- दहिवडी रस्त्यावरील वाहतूक पहाटे तीन वाजले पासून सकाळी साडेसात वाजेपर्यंत बंद झाली होती. तर अलगुडेवाडी गावच्या ओढ्याला आलेल्या पुरामुळे फलटण-आसू या रस्त्यावरील वाहतूकही पहाटे तीन वाजलेपासून बंद आहे. तर सोनवडी गावाच्या ओढ्याला आलेल्या पुरामुळे फलटण शिंगणापूर रस्ता बंद झाला आहे.