सात कार बंद पडल्याने वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:39 AM2021-01-25T04:39:28+5:302021-01-25T04:39:28+5:30
खंडाळा : पुणे - सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात पाचव्या वळणावर सहा ते सात सीएनजी कार अचानक बंद पडल्याने घाट ...
खंडाळा : पुणे - सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात पाचव्या वळणावर सहा ते सात सीएनजी कार अचानक बंद पडल्याने घाट रस्ता ठप्प झाला होता. शनिवार व रविवार सलग सुट्ट्या असल्याने रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी होती. त्यामुळे खंबाटकी घाटाच्या पायथ्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
पुण्याहून-साताऱ्याकडे जात असताना घाटमाथ्यावर दत्त मंदिर व खामजाई मंदिर परिसरात चारपदरीचे काम रखडल्याने येथे सिंगल लेन सुरू होती. यामुळे येथे वाहने बंद पडून अनेकवेळा घाटात वाहतूक ठप्प होऊन कोंडी होत असते. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून येथेच वाहने बंद पडल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. दरम्यान, घटनास्थळी तत्काळ खंडाळा पोलीस ठाण्याचे विठ्ठल पवार हे दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
खंबाटकी घाटात अचानक वाहतूक कोंडी झाल्याने अनेकांची तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. दरम्यान, साडेदहा वाजता कोंडी झालेली वाहतूक कॅनॉलमार्गे बोगद्याकडे वळविण्यात आली, तर बोगद्यामार्गे वाहतूक सोडल्यानंतर सातारा ते पुण्याकडे येणाऱ्या वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याचे चित्र होते. सकाळी साडेअकराच्या दरम्यान एक पोलीस व दोन होमगार्ड असल्याने पोलिसांचे वाहतुकीवर नियंत्रण राहिले नसल्याने वाहतूक खोळंबली होती. त्यानंतर तब्बल दोन तासांनी खंडाळ्याचे अधिक पोलीस घाटात रवाना झाले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु केला. तोपर्यंत घाटातील वाहतूक धिम्या गतीने सुरु होती.
फोटो २३खंडाळा-घाट
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात शनिवारी वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. (छाया : दशरथ ननावरे)