भटक्या जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:39 AM2021-04-27T04:39:30+5:302021-04-27T04:39:30+5:30
पुसेगाव : मोकाट जनावरांच्या झुंडीच्या झुंडी फिरत असून अनेकदा ही जनावरे रस्त्यावरच ठाण मांडून बसत आहेत. नागरिकांबरोबरच वाहनधारकांनाही याचा ...
पुसेगाव : मोकाट जनावरांच्या झुंडीच्या झुंडी फिरत असून अनेकदा ही जनावरे रस्त्यावरच ठाण मांडून बसत आहेत. नागरिकांबरोबरच वाहनधारकांनाही याचा नाहक त्रास होत आहे. कोविड काळात संचारबंदीमुळे रस्त्यांवर गर्दी कमी असल्याने त्यांचे ठाण मांडण्याचे प्रमाण वाढले आहे.
कलिंगडाला मागणी
सातारा : उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस अधिकच वाढत असल्याने शीतपेयांबरोबर गारवा देणारी कलिंगड व टरबुजे विक्रीसाठी दाखल झाली आहेत. लॉकडाऊनमुळे शहरात सकाळी ७ ते ११ यावेळेत दुकाने सुरू असतात. महामार्गावर रस्त्याशेजारी उभे राहून ग्राहक आस्वाद घेताना दिसत आहेत.
चिलटांचा त्रास
कोरेगाव : पारा वाढल्याने त्रस्त नागरिकांना आता चिलटांनीही हैराण केले आहे. कोणत्याही महत्त्वाच्या कामात असले तरी एका हाताने चिलटे हाकलण्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. दिवसभर घरात बसावं लागल्याने वैतागलेल्या नागरिकांना चिलटांनी अक्षरश: वैताग आणला आहे.
ग्रामस्थ त्रस्त
सातारा : कास परिसरात प्रेमीयुगुलांची लूट होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता प्रेमीयुगुलांनी कण्हेर धरण परिसराचा आसरा घेतला आहे. त्यांच्या चाळ्यांमुळे स्थानिक त्रस्त आहेत. महाविद्यालये बंद असली तरी घरी किरकोळ कारण सांगून दुपारी उन्हाच्या पाऱ्यातही तरुणाई येत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
पाणीटंचाई
दहिवडी : माण, दहिवडी भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. कोरोनामुळे शेतातील मालही पडून असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना जगवायला शासनाने या भागात लोकवस्ती व जनावरांसाठी पाणी आणि चारा त्वरित उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आहे.
पर्यटक वाढले
पाटण - उन्हाळ्याची सुटी लागल्यामुळे पाटण परिसरात पर्यटकांची संख्या वाढली आहे. धरण परिसराबरोबरच उद्यानात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. लॉकडाऊन असलं तरीही जिल्ह्यात फिरायला काहीच अडचण नसल्याने पर्यटकांच्या गाड्या या भागात सुसाट जात आहेत.
गव्यांचे दर्शन
पेट्री : कास पठार ते महाबळेश्वर या राजमार्गावर गव्यांचे दर्शन होत आहे. वर्दळ वाढली असल्याने काही वेळा दुचाकीचालक आणि गव्यांचा कळप आमनेसामने येत असून, गव्यांच्या संवर्धनासाठी या भागात तातडीने उपाय योजण्याची गरज आहे. गवा दिसल्यानंतर त्याचा फोटा आणि व्हिडिओ काढण्याचाही सर्रास प्रकार होत आहे.
---------------------------