फलटणमध्ये चक्काजाम, पुणे-पंढरपूर मार्गावरील वाहतूक खोळंबली; मराठा समाजाची आरक्षणाची मागणी
By दीपक शिंदे | Published: September 4, 2023 03:54 PM2023-09-04T15:54:10+5:302023-09-04T15:56:45+5:30
मलटण : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांवरील पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ व आरक्षण ...
मलटण : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांवरील पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ व आरक्षण मागणीसाठी आज, सोमवारी फलटणमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने क्रांतिसिंह नाना पाटील चौकात महाड पंढरपूर महामार्गावर चक्का जाम करण्यात आला. दरम्यान फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे मागणीचे निवेदन देण्यात आले.
आज सोमवार दि. ४ रोजी सकाळी १० वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. यानंतर शपथ घेऊन उपस्थित मराठा समाज बांधव क्रांतिसिंह नाना पाटील चौकात पोहचले. यावेळी ‘आरक्षण आमच्या हक्काचे; ‘अरे कोण म्हणते देत नाही; घेतल्याशिवाय राहत नाही’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणा देत सर्वच राज्यकर्त्यांचा निषेध केला.
वाहतूक ठप्प
दरम्यान, पुणे- पंढरपूर महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे तसेच पंढरपूर येथे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. महाड पंढरपूर महामार्गावरील फलटणमधील नाना पाटील चौक येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आले होते. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे विविध समन्वयक व शेकडो मराठा बांधव उपस्थित होते.