वाहतूक पोलिसाने एक तोळ्याची अंगठी केली परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:37 AM2021-02-12T04:37:32+5:302021-02-12T04:37:32+5:30
सातारा : पालिकेच्या अग्निशमन विभागातील अधिकारी सौरभ साळुंखे यांची एक तोळ्याची अंगठी शिवशाही बसला लागलेली आग विझविताना गहाळ झाली ...
सातारा : पालिकेच्या अग्निशमन विभागातील अधिकारी सौरभ साळुंखे यांची एक तोळ्याची अंगठी शिवशाही बसला लागलेली आग विझविताना गहाळ झाली होती. वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी संजय साबळे यांना ही अंगठी सापडली व त्यांनी प्रामाणिकपणे ती साळुंखे यांना सुपूर्द केली. खाकीने दाखविलेल्या या प्रामाणिकपणाचे सर्वांनीच भरभरून कौतुक केले.
सातारा बसस्थानकातील एका शिवशाही बसला बुधवारी सायंकाळी अचानक आग लागली. ही आग इतकी मोठी होती की बघता बघता पाच गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. ही घटना समोर येताच पालिकेच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले. दरम्यान, बचावकार्य करत असताना अग्निशमन विभागाचे प्रमुख सौरभ साळुंखे यांची एक तोळ्याची अंगठी अचानक त्यांच्या बोटातून निसटून गहाळ झाली.
यावेळी कर्तव्य बजावत असलेले वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी संजय साबळे यांना ही अंगठी सापडली. घटनास्थळी विचारपूस केल्यानंतर सौरभ साळुंखे यांना आपल्या बोटात अंगठी नसल्याचे निदर्शनास आले. ही बाब साळुंखे यांनी साबळे यांना सांगितली. यानंतर संजय साबळे यांनी ओळख पटवून एक तोळ्याची अंगठी सौरभ साळुंखे यांना सुपूर्द केली. साळुंखे यांनी दाखविलेल्या या प्रामाणिकपणाचे उपस्थित नगरसेवकांसह नागरिकांनी कौतुक केले.
फोटो : ११ ट्राफिक पोलीस
सातारा वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी संजय साबळे यांनी सौरभ साळुंखे यांना एक तोळ्याची अंगठी परत केली.