विटा मार्गावर वाहतूक होणार सुखकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:43 AM2021-09-22T04:43:34+5:302021-09-22T04:43:34+5:30

कऱ्हाड ते विटा मार्गावर कृष्णा नदीवर गत काही वर्षांपासून नवीन पुलाचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांत हा पूल ...

Traffic will be smooth on Vita Marg | विटा मार्गावर वाहतूक होणार सुखकर

विटा मार्गावर वाहतूक होणार सुखकर

Next

कऱ्हाड ते विटा मार्गावर कृष्णा नदीवर गत काही वर्षांपासून नवीन पुलाचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांत हा पूल वाहतुकीला खुला होण्याची शक्यता आहे. नवीन पुलाचे काम पूर्णत्वास आल्याने रस्त्याची रुंदी वाढणार असून, त्यामुळे कॅनॉल चौकासह कृष्णा नाक्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार आहे. हा पूल नदीच्या तळापासून तब्बल १२५ फूट उंच आहे. पुलाच्या बांधकामासाठी ३५ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या मार्गावरील इतर पुलांच्या तुलनेत सर्वात शेवटी काम सुरू झालेला आणि सर्वात आधी पूर्णत्वास आलेला हा पूल आहे. पूल नदीच्या तळापासून १२५ फूट उंच तर नदीच्या पाण्याच्या वरील पात्रापासून तब्बल ७० फूट उंच असून पूल कमी जागेत आहे. पुलाचे काम सुरू असताना दोनवेळा नदीला महापूर आला होता. मात्र, तरीही हा पूल सुस्थितीत आहे. सध्या पुलाच्या जोडरस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.

दरम्यान, या रस्त्याचे रुंदीकरण करताना मोठा विरोध झाला होता. जमीन भूसंपादन असतानाही तेथील प्रश्न सोडवून हे काम मार्गी लावताना संबंधित विभागाला अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली होती. अनेक अडथळे पार करीत रस्त्याचे काम पूर्णत्वास नेण्यात आले आहे. कोरोनाच्या काळातही हे काम सुरूच ठेवण्यात आले होते. सैदापूर येथील पाणी निचऱ्याचा किचकट व अवघड प्रश्नही सध्या मार्गी लागला आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रशासनाला प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली होती.

- चौकट

नवीन कृष्णा पुलाची वैशिष्ट्ये

१) पुलाची लांबी ३२० मीटर

२) चाळीस मीटरचे आठ गाळे

३) पाइल फाउंडेशन पायाचा प्रकार

४) सिंगल सेल बॉक्स गर्डरचे स्लॅब

५) पाया मजबुतीसाठी प्रत्येक पिलरला सहा पाइप.

६) कठीण दगडात दोन मीटर अँकर केले आहे.

७) आठ मीटरचा रोड वे व दीड मीटरचा पादचारी रस्ता.

८) पुलावर पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

९) पुलाचे वय सुमारे शंभर वर्ष गृहीत धरण्यात आले आहे.

- चौकट

जुन्या पुलाच्या आठवणी कायम

कृष्णा नदीवर ज्या ठिकाणी हा नवीन पूल उभारण्यात आला आहे त्याच पुलाच्या शेजारी जुना पूल असून, काही वर्षांपूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव त्या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली. त्यानंतर काही महिन्यांतच आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये जुन्या पुलाचा काही भाग कोसळला. सध्या हा कोसळलेल्या पुलाचा सांगडा तसाच उभा असून संबंधित जुन्या पुलाच्या आठवणी शहरवासीयांच्या मनात घर करून आहेत.

- चौकट

कृष्णा नाका, कॅनॉल चौक घेणार मोकळा श्वास

कृष्णा नाका आणि कृष्णा कॅनॉल चौक यादरम्यान हा पूल असून, सध्या एकाच पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नाक्यासह कृष्णा कॅनॉल चौकात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. नवीन पूल वाहतुकीस खुला झाल्यानंतर नाका आणि चौकातील कोंडीचा प्रश्न मिटणार असून, ही दोन्ही ठिकाणे मोकळा श्वास घेणार आहेत.

फोटो : २१केआरडी०२

कॅप्शन : कऱ्हाड-विटा मार्गावरील कृष्णा नदीवर सध्या नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काही दिवसांत हा पूल वाहतुकीस खुला होण्याची शक्यता आहे.

Web Title: Traffic will be smooth on Vita Marg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.