महाराष्ट्र घडविणाऱ्यांच्या संस्थेत शोकांतिका
By admin | Published: May 8, 2016 12:30 AM2016-05-08T00:30:02+5:302016-05-08T00:33:38+5:30
उदयनराजे भोसले : रयत शिक्षण संस्थेतील विनाअनुदानित कृती समितीच्या उपोषणास पाठिंबा
सातारा : ‘कर्मवीर अण्णांनी बहुजन, उपेक्षित असलेले लोक मोठे व्हावे, या ध्यास विचारांच्या आधारावर रयतेची घटना निर्माण केली. त्यात बदल का केला गेला, हे मला समजत नाही. रयतेची घटना निर्माण झाली त्यावेळी यात राजकारण आणू नये, अशी त्यांची इच्छा होती. म्हणून आज येथे कोणी राजकारण आणू नये. सर्व शिक्षक आपल्या संस्थेचे आहेत. भले मला संस्थेत स्थान देऊ नका; पण शिक्षकांना त्यांचे स्थान द्यावे,’ असे आवाहन प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
रयतच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विनाअनुदानित आदी शिक्षकांना सेवेत सेवाज्येष्ठतेनुसार सामावून घ्यावे, या मागणीसाठी रयत विनाअनुदानित कृती समितीने संस्थेच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. शनिवारी उपोषणाचा चौथा दिवस होता. या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी खा. उदयनराजे भोसले उपोषणस्थळी आले होते. यावेळी ते बोलत होते.
उदयनराजे म्हणाले, ‘महाराष्ट्राची जडण-घडण करणाऱ्या व्यक्ती या संस्थेत असताना शिक्षकांचा प्रश्न सुटत नाही, ही एक शोकांतिका आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचीच या शिक्षकांना न्याय देण्याची जबाबदारी आहे. कर्मवीरांच्या विचारांना चालना द्यायची असेल तर यांना संस्थेत सामील करून घ्यावे लागेल. आम्ही कुणाच्या विरोधात नाही. छ. शिवाजी महाराजांनी ज्या विचारांनी वाटचाल केली, त्याच विचारांनी आम्ही वाटचाल करीत आहोत. राजमाता सुमित्राराजे भोसले यांना कर्मवीरांचे विचार पटले आणि त्यांनी ही संस्था धननीच्या बागेतून सुरू केली. कोणतेही भेदभाव न करता आजपर्यंत या संस्थेचे कामकाज सुरू आहे, अण्णांनी ‘कमवा व शिकवा’ ही योजना जगात प्रथम आणली आणि याच योजनेचा लाभ घेत राजकारण, समाजकारण विविध क्षेत्रांत अनेकजण मोठे झाले आहेत,’ असा टोलाही उदयनराजे यांनी यावेळी लगावला. दरम्यान, शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांविषयी उदयनराजे भोसले यांच्याशी सविस्तर चर्चा
केली. (प्रतिनिधी)