पुण्याला गेलेले पथक रिकाम्या हाताने परत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:25 PM2017-07-19T13:25:16+5:302017-07-19T13:25:16+5:30
माजी सैनिकाच्या बेपत्ता होण्यापाठीमागचे गूढ वाढले
आॅनलाईन लोकमत
(जि. सातारा), दि. १९ : येथील तामजाईनगरमधील माजी सैनिक राहुल आढाव व पत्नी व दोन मुलींसह गेल्या १५ दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी शाहूपुरी पोलिसांचे एक पथक मंगळवारी पुणे येथे गेले होते. मात्र या पथकाला आढाव कुटुंबाबात काहीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे हे पथक रिकाम्या हाताने परत आले.
खासगी सावकारीला कंटाळून माजी सैनिक राहुल आढाव पत्नी स्वाती तसेच दोन लाहन मुलींना घेऊन ४ जुलै रोजी घरातून निघून गेल आहेत. जाताना त्यांनी आम्ही आत्महत्या करत असल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटले होते. त्यामुळे त्यांच्याविषयी चिंता व्यक्त होत आहे. राहुल आढाव यांच्या आईने पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन माज्या मुलाचा तत्काळ शोध लावावा, अशी मागणी केली आहे. मात्र आढाव यांच्याबाबत अद्याप ठोस माहिती पोलिसांनाही मिळेनासी झाली आहे.
पुणे येथील कात्रज परिसरात राहुल आढाव काही दिवस वास्तव्यास होते. त्यामुळे सातारा पोलिस त्यांच्या शोधासाठी पुणे येथे गेले होते. तेथे काही लोकांशी विचारपूस केल्यानंतर ते बरेच दिवस पुण्यात आले नसल्याचे नगरिकांकडून पोलिसांना समजले. त्यामुळे त्यांच्या बेपत्ता होण्यापाठीमागचे गूढ आणखीनच वाढले आहे. त्यांच्या मोबाइलचे लोकेशनही अद्याप पोलिसांच्या हाती मिळाले नाही.