शिकाऊ नर्स बनली चक्क ‘देवमाणूस’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:43 AM2021-05-20T04:43:23+5:302021-05-20T04:43:23+5:30

कऱ्हाड : कोरोना रुग्णांवर उपचार करताना भल्याभल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा कस लागतोय; पण कऱ्हाड तालुक्यातील नारायणवाडीत चक्क शिकाऊ नर्सने दवाखाना ...

Trainee nurse became a 'godman'! | शिकाऊ नर्स बनली चक्क ‘देवमाणूस’!

शिकाऊ नर्स बनली चक्क ‘देवमाणूस’!

Next

कऱ्हाड : कोरोना रुग्णांवर उपचार करताना भल्याभल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा कस लागतोय; पण कऱ्हाड तालुक्यातील नारायणवाडीत चक्क शिकाऊ नर्सने दवाखाना थाटून कोरोना रुग्णांवर उपचार केले. गोळ्या, बिस्किटासारखी औषधे वाटली. एवढेच नव्हेतर, घरात जाऊन रुग्णांना तिने थेट ‘सलाईन’ही लावली. गावकऱ्यांसाठी ती ‘देवमाणूस’च बनलेली; पण अखेर तिच्या बोगसगिरीचा पर्दाफाश झाला आणि बुधवारी पोलिसांनी तिला अटक केली.

नारायणवाडीतील या बोगस महिला डॉक्टरची कहाणी चांगलीच रंजक आहे. ती महिला सुरुवातीला एका डॉक्टरच्या हाताखाली काम करायची. काही दिवसांनी तिने त्या रुग्णालयातील काम सोडले. त्यानंतर दुसऱ्या दवाखान्यात काम केले. तेथेही रामराम ठोकून ती तिसऱ्या दवाखान्यात पोहोचली. अखेर नारायणवाडीच्या ‘पंत क्लिनिक’ या दवाखान्यात ती स्थिरावली. डॉक्टरांच्या हाताखाली काम केल्याचा अनुभव गाठीशी होता. थंडी, ताप, सर्दीला कोणती औषधे द्यायची, हेही तिला माहिती झालेले. त्यामुळे डॉक्टरांच्या अनुपस्थितीत तिनेच रुग्णांवर औषधोपचार सुरू केले. सुरुवातीला तो दवाखाना दुसरेच डॉक्टर चालवायचे. मात्र, चुकीच्या औषधोपचाराची कुणकुण लागताच आरोग्य विभागाने त्या डॉक्टरांना तंबी दिली. संबंधित डॉक्टरांनी तातडीने त्या ठिकाणची ‘प्रॅक्टिस’ बंद केली. त्यानंतर दुसरे डॉक्टर त्या दवाखान्यात ‘प्रॅक्टिस’ला येऊ लागले. तेही सध्या तिकडे फिरकत नाहीत. मात्र, शिकाऊ नर्स असलेल्या त्या बोगस महिला डॉक्टरने तो दवाखाना चालवायला सुरुवात केली.

सुमारे दोन वर्षांपासून ती त्या दवाखान्यात ‘डॉक्टर’ म्हणून येत होती. ग्रामस्थही उपचार करून घेत होते. आणि सध्यातर कोरोनाबाधित रुग्णांनाच त्या बोगस डॉक्टरने ‘ट्रीट’ करायला सुरुवात केलेली. अखेर बुधवारी या सर्व प्रकाराचा भांडाफोड झाला. आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा मारून त्या बोगस महिला डॉक्टरला अटक केली.

- चौकट

...असा झाला भांडाफोड

नारायणवाडीत कोरोनाचे तब्बल ७० रुग्ण आहेत. त्यापैकी ४० रुग्ण होम आयसोलेट असून, ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गावातील ‘डेथ रेट’ वाढल्यामुळे काले आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. पाटील यांना संशय आला. त्यांनी चौकशी केली. त्या वेळी ‘पंथ क्लिनिक’चे नाव समोर आले. तेथील महिला डॉक्टर कोरोना रुग्णांवर उपचार करीत असल्याचे डॉ. यादव यांना समजले. चौकसबुद्धीने डॉ. यादव यांनी याची अधिक चौकशी केली आणि बोगस महिला डॉक्टरच्या कारनाम्यांचा पर्दाफाश झाला.

- कोट

नारायणवाडीतील बोगस डॉक्टरबाबत यापूर्वीच माहिती मिळाली होती. दोनवेळा आम्ही त्या ठिकाणी भेटही दिली. मात्र, संबंधित महिला आम्हाला भेटली नाही. बुधवारी रुग्णावर उपचार करतानाच ती रंगेहाथ आढळून आली. त्या दवाखान्यासाठी कोणत्या मूळ डॉक्टरांनी परवानगी घेतली आहे, याची आम्ही सध्या माहिती घेत आहोत.

- डॉ. आर. बी. यादव

वैद्यकीय अधिकारी, काले

फोटो : १९केआरडी०३

कॅप्शन : नारायणवाडी, ता. कऱ्हाड येथून बोगस महिला डॉक्टरला पोलिसांनी अटक केली. तसेच दवाखान्याचा फलकही ताब्यात घेण्यात आला.

Web Title: Trainee nurse became a 'godman'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.